पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेट्रो रेलवे कार्पोरेशनच्या (महामेट्रो) प्रस्तावित २३.२ किलोमीटर लांबीच्या मार्गिका येत्या वर्षभरात सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टाॅप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी नऊ हजार ८९७ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून जाहीर करत पुणेकरांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी स्वारगेट ते कात्रज मार्गिकेला मंजुरी दिली आहे, असाही पुनरूच्चार केला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडल्या असून येत्या दिवाळीपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर करताना पुण्यातील मेट्रोचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार उपनगरीय भागात मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचे जाहीर करत पुणेकरांना खूश करण्याता प्रयत्न केला आहे. अर्थमंत्री पवार यांनी पुण्यातील मध्यवर्ती भागापासून पिंपरी चिंचवड पर्यंत अशी ३३.२८ किलोमीटर मार्गिकेवर मेट्रो धावत असून येत्या वर्षभरात नव्याने २३.२ किलोमीटर अंतरापर्यंतच्या मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
महानगरपालिकेत खडकवासला, किरकटवाडी, कोंढवे धावडे, मांजरी, नांदेड अशी अनेक गावे महानगरपालिकेत समाविष्ट झाली आहेत. या गावांमधील नागरीक आगामी निवडणुकीत प्रथमच महानगरपालिकेसाठी मतदान करणार आहेत. त्यामुळे या नागरिकांना महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने खडकवासला- स्वारगेट – हडपसर-खराडी असा ३१.६४ किलोमीटर आणि नळस्टाॅप ते वारजे, माणिकबाग हा ६.१२ किलोमीटर मार्गिका प्रस्तावित आहेत. त्यासाठी नऊ हजार ८९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या प्रस्तावला राज्य सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आला असून केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
तसेच स्वारगेट ते कात्रज या ५.५ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गिकेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून पुणेकरांना नवीन कुठलाही मार्ग मिळाला नसून जुन्यात मार्गांचा उल्लेख करून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना खुश करण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरात सुरू असलेले ३३.२८ किलोमीटर मार्गिका
- पीसीएमसी ते फुगेवाडी – ७ किमी
- फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय – ६.९१ किमी
- जिल्हा न्यायालय ते स्वारगेट – ३.६२ किमी
- गरवारे महाविद्यालय ते जिल्हा न्यायालय – ५ किमी
- जिल्हा न्यायालय ते रुबी हाॅल – २.३७ किमी
- रुबी हाॅल ते रामवाडी – ६ किमी
केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी
खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी – ३१.६४ किमी
नळ स्टाॅप ते वारजे माणिकबाग – ६.१२ किमी