पुणे : महापालिकेतील सेवानिवृत्त मुकादमाच्या शिल्लक रजेच्या बदल्यातील रकमेचा धनादेश देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण दत्तात्रय पासलकर (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका सेवानिवृत्त मुकादमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार महापालिकेच्या आरोग्य विभागातून मुकादम म्हणून २०२२ मध्ये निवृत्त झाले होते. शिल्लक रजा विकल्याने त्यांनी रजेच्या बदल्यात पैसे मिळावेत, असा अर्ज केला होता. पासलकर याने धनादेश देण्यासाठी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर महापालिका आवारात शुक्रवारी सापळा लावून पासलकर याला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत.