पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आता जपानची राजधानी टोकियो शहरामध्ये उभारण्यात येणार आहे. जानेवारी अखेरीस स्मारकाचे भूमिपूजन होणार असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुतळ्याचे उदघाटन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील अकरा गड किल्ल्यांचे माती, पाणी भूमिपूजनासाठी नेण्यात येणार आहे.

आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने अखिल जपान भारतीय महासंघ आणि एदोगावा इंडिया कल्चर सेंटर, टोक्यो यांच्या सहकार्याने टोकियो शहरामध्ये हा पुतळा उभारण्यात येणार आहे, माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी गुरुवारी दिली.

हेही वाचा…शहरबात: मर्सिडीज बेंझ, राज्यातील उद्योग पलायन अन् शासकीय यंत्रणा…

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांना प्रास्ताविक नामांकन मिळालेले आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि तामिळनाडू येथील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश आहे. याचा प्रसार करणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. या पुतळ्याची निर्मिती पुण्यातील विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल आणि विराज करणार आहेत.