पुणे: पंजाब, राजस्थानमधील लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित संतोष जाधव या सराईत गुन्हेगाराच्या नावाने कोथरूडमधील एका व्यावसायिकाकडे खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत कोथरुडमधील एका व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिकाकडून खोदकामासाठी जेसीबी यंत्र पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांना शनिवारी रात्री अनोळखी क्रमांकावरुन दूरध्वनी आला. ‘पंजाबमधील सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरण माहीत आहे का ?, मी संतोष जाधव बोलत आहे. तुझी सुपारी देण्यात आली असून, जीव वाचवायचा असेल तर १५ लाख रुपये खंडणी दे. अन्यथा गोळ्या घालीन’, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. धमकीमुळे व्यावसायिक घाबरला. त्याने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा… आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल
दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. व्यावसायिकाला धमकावणाऱ्या आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. मोबाईल क्रमांकाची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी संशयावरुन दोघांना ताब्यात घेतले.
मंचरमधील संतोष जाधव बिष्णोई टोळीच्या संपर्कात कसा ?
संतोष सुनील जाधव (वय २८, रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) दिल्लीतील लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुन्हेगार आहे. जाधवसह त्याच्या टोळीतील सहा जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी जुलै महिन्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का ) कारवाई केली. तो सध्या कारागृहामध्ये आहे. नारायणगावमधील एका व्यावसायिकाला जाधव टोळीतील गुंडांनी खंडणी मागितली होती. जाधव याने पूर्ववैमनस्यातून मंचर परिसरात ओंकार उर्फ राण्या बाणखेले याचा खून केला होता. या प्रकरणात त्याच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली होती. कारवाई केल्यानंतर जाधव मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पसार झाला होता. त्यानंतर पंजाबमधील गुंड लाॅरेन्स बिष्णोई टाेळीच्या तो संपर्कात आला होता. जाधव आणि त्याच्या मित्रांनी हरयाणातील अंबालामध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार केली हाेती.