लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या गटाने ७.५ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरातून उत्सर्जित होणाऱ्या अतिप्रचंड झोतांचा वेध घेतला आहे. खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) सहाय्याने हे संशोधन करण्यात आले असून, २३ दशलक्ष प्रकाशवर्षे पसरलेल्या या झोताचे पोर्फिरियन असे नामकरण करण्यात आले आहे.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (जीएमआरटी) या बाबतची माहिती दिली. या संशोधनाचा शोधनिबंध नेचर या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) मधील पोस्टडॉक्टरल अभ्यासक आणि मुख्य संशोधक मार्टिन ओई, इंग्लंडमधील हर्टफोर्डशायर विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्राचे प्राध्यापक मार्टिन हार्डकॅसल, जॉर्ज जोर्गोव्स्की यांचा संशोधनात सहभाग होता.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड: रोड रोमिओने त्रास दिल्याने १२ वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनी तपास करून आरोपींना…

विश्व ६.३ अब्ज वर्षाचे असताना सूर्याच्या एक लाख कोटीपट जास्त शक्ती असलेले ऊर्जेचे हे झोत या दूरस्थ दीर्घिकेच्या मध्यभागी असलेल्या एका महाप्रचंड कृष्णविवरातून वरून आणि खालून बाहेर पडतात. प्रत्येक मोठ्या दीर्घिकेच्या मध्यभागी सुमारे एक दशलक्ष ते एक अब्ज सौर वस्तुमानाचे एक मोठे कृष्णविवर असते. संशोधनातून वेध घेण्यात आलेले अतिप्रचंड झोत तब्बल १४० दीर्घिका सलग एका ओळीत जोडण्यासारखे आहे. संशोधक चमूने महाप्रचंड ऊर्जा झोत तयार करणाऱ्या दीर्घिका ओळखण्यासाठी संवेदनशील, उच्च विभेदन क्षमता (रिझोल्यूशन) असलेल्या जीएमआरटीद्वारे निरीक्षणे केली. दीर्घिकांची ओळख पटल्यानंतर संशोधकांनी हवाई येथील दुर्बिणीचा वापर करून अंतर प्राप्त केले. त्यानुसार पोर्फिरिओन पृथ्वीपासून ७.५ अब्ज प्रकाश-वर्षे दूर आहे.

अतिप्रचंड झोत (जेट) प्रणाली ही मूळतः युरोपातील लो फ्रिक्वेन्सी ॲरे (लोफार) या रेडिओ दुर्बिणीचा वापर करून सापडलेल्या हजारो अस्पष्ट महाकाय कृष्णविवरांच्या रचनांपैकी एक आहे. त्यामुळे महाकाय कृष्णविवरांच्या रचनांच्या अस्तित्त्वाची कल्पना होती. मात्र, असे आणखी बरेच घटक विश्वास असतील याची कल्पना नव्हती. दीर्घिकांमधून उदयास येणाऱ्या आणि त्यामधील महाकाय कृष्णविवरांमधून महाप्रचंड ऊर्जा उत्सर्जित करणाऱ्या झोतांची लांबी निश्चित करण्यासाठी, एका शक्तिशाली रेडिओ दुर्बिणीची गरज होती. ते काम जीएमआरटीने केले, असे हार्डकॅसल यांनी नमूद केले.

आणखी वाचा-राज्यात कंत्राटी नोकरभरती सुरूच… आता १०९ पदांचे काम कंत्राटी तत्त्वावर…

दीर्घिका आणि त्यांची मध्यवर्ती अतिप्रचंड कृष्णविवरे सहउत्क्रांत होत आहेत. ही कृष्णविवरे जेटच्या रूपात प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर टाकतात, त्यामुळे त्यांच्या यजमान दीर्घिका आणि त्यांच्या जवळील इतर दीर्घिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, हा त्यातील वेगळा पैलू आहे, असे जोर्गोव्स्की म्हणाले.

लोफार दुर्बिणीच्या सर्वेक्षणात आकाशाचे १५ टक्केच निरीक्षण केले आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर उत्सर्जित करणारी कृष्णविवरे शोधणे कठीण आहे. त्यामुळे जीएमआरटी, लोफार, तसेच केक या तीन दूरदर्शक प्रणाली येत्या काही वर्षांत पोर्फिरिओनसारखे आणखी काही खगोलीय घटक शोधू शकतील. चुंबकत्व वैश्विक पसाऱ्यात सुरू होऊन ते दीर्घिका, तारे, ग्रहांपर्यंत पोहोचते. मात्र ते सुरू कुठे होते, या महाप्रचंड ऊर्जा झोताने ब्रह्मांडात चुंबकत्व पसरवले आहे का, याचा शोध घ्यायचा आहे, असे ओई यांनी सांगितले.