पुणे : लंडनमधील ऐतिहासिक रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आज (९ एप्रिल) होणाऱ्या वादन महोत्सवात पुण्यातील विद्यार्थ्यांना व्हायोलिन वादनाची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवात जगभरातील १३०० विद्यार्थ्यांचा सहभाग असून, त्यातील ४२ विद्यार्थी भारतातील आहेत आणि हे सर्व ४२ विद्यार्थी पुण्याचे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये जगभरातील ब्रिटिश सुझुकी म्युझिक असोसिएशनतर्फे वादन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सहभागी होणारे सहा ते सोळा या वयोगटातील विद्यार्थी सुझुकी शिक्षण पद्धतीने वाद्य वादन शिकतात. जपानमधील व्हायोलिन वादक डॉ. शिनीची सुझुकी हे सुझुकी शिक्षण पद्धतीचे जनक होते. प्रत्येक मुलामध्ये सांगीतिक क्षमता असते व अनुकूल परिस्थिती व वातावरणामध्ये या क्षमतेचा विकास होतो. या तत्त्वावर डॉ. शिनीची सुझुकी यांची श्रद्धा होती. त्यानुसार ही शिक्षण पद्धती विकसित झाली आहे. मातृभाषेप्रमाणे सतत कानावर पडणारे संगीत, पालक आणि शिक्षक यांच्या प्रोत्साहनामुळे मुलाला शिकताना सहजता आणि आनंद मिळतो, अशी या शिक्षण पद्धतीची धारणा आहे. रॉयल अल्बर्ट हॉलमधील महोत्सवात वेगवेगळ्या वाद्यांचे वादन केले जाईल. त्यात पुण्यातील सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिनच्या ४२ विद्यार्थ्यांना व्हायोलिन वादनाची संधी मिळाली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक येथे विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन जागतिक ख्यातीच्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचीही संधी मिळाली.

हेही वाचा – गोष्ट पुण्याची: भाग ७५- शंभर वर्षांपासून दिमाखात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराज पूल

रॉयल अल्बर्ट हॉलसारख्या प्रतिष्ठेच्या वास्तूमध्ये वादनाची संधी मिळाल्याचा आनंद आहे. संगीत भाषेच्या पलीकडे असते याचा अनुभव या निमित्ताने आला. कारण जगभरातील २४ देशांतील १३०० मुले एकत्र वादन करत आहेत. हा अत्यंत आनंददायी अनुभव आहे, असे पुण्यातून लंडनला गेलेल्या ४२ विद्यार्थ्यांपैकी इरावती जोशी आणि तिचे पालक धीरेश जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा – विविध जिल्ह्यांतून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी केला पर्दाफाश; २१ लाखांच्या ४३ दुचाकी केल्या हस्तगत

सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिनच्या रमा चोभे म्हणाल्या, की यापूर्वी २०१६ मध्ये अल्बर्ट हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात आमच्या संस्थेच्या मुलांना वादनाची संधी मिळाली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा ही संधी मिळाली आहे. अल्बर्ट हॉलसारख्या मोठा वारसा असलेल्या वास्तूमध्ये लहान वयात मुलांना वादनाची संधी मिळणे ही मोठी गोष्ट आहे. जगभरातून १३०० मुले आणि अनेक नामांकित शिक्षकांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची, शिकण्याची संधी मुलांना मिळाली आहे. काही विद्यार्थ्यांना एकल वादनाचीही संधी मिळाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An opportunity for 42 students from pune to play violin at the historic royal albert hall in london pune print news ccp 14 ssb