कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी भाजपाने हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. अशाच हिंदू महासभा अध्यक्ष आनंद दवे यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीत मनसेने उमेदवार दिला नसलाने आनंद दवे यांनी थेट राज ठाकरे यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा! गोदरेज कंपनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

नेमकं कायम म्हणाले दवे?

“कोणत्याही राजकीय पक्षाने प्रत्येक निवडणुकीत तठस्थ राहण्यापेक्षा कोणतीतरी भूमिका घेणं गरजेचं असतं. राज ठाकरे हे भाजपाला पाठिंबा देतील, असं वाटत होतं. मात्र, आतापर्यंत त्यांनी असे कोणतेही संकेत दिले नाहीत. खरं तर कसबा मतदारसंघात मनसेची ठरावीक मतं आहेत. ती मतं जर मला मिळाली, मनसेनी मला पाठिंबा दिला, तर माझा विजय सोपा होऊ शकतो आणि मनसेचा एक हक्काचा आमदार विधानसभेत जाऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरेंनी याचा विचार करावा”, अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली. तसेच आतापर्यंत याबाबतीत राज ठाकरेंशी कोणताही संपर्क झाला नसून मी मीडियाच्या माध्यमांतून त्यांच्याकडे मागणी करतो आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड आणि विधानसभा पोटनिवडणुकीत कोणालाही पाठिंबा जाहीर केला नसून कार्यकर्त्यांनी पुढच्या आदेशापर्यंत कुणाचाही प्रचार करू नये अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, आनंद दवे यांच्या मागणीनंतर मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader