पुणे : भाजपाने कसबा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांपैकी कोणालाही उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. कुटुंबियांपैकी कोणालाही संधी न दिल्याने शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपण कसबा पोटनिवडणुकीसाठी उद्या उमेदवारी दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – पुण्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी, नाराज बाळासाहेब दाभेकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही संधी न दिल्याने शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला असून, हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादनदेखील केले. शैलेश टिळक यांची भेट घेतल्यानंतर आनंद दवे म्हणाले की, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मी उद्या उमेदवारी दाखल करणार आहे. आम्ही ही निवडणूक जिंकण्यासाठी लढणार असून, या मतदारसंघात विविध समाजाचे नागरिक राहतात, त्यामुळे आम्हाला निश्चित यश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.