पुणे शहर काँग्रेसकडून सातत्याने मिळत असलेली उपेक्षेची वागणूक यापुढेही चालू राहिली, तर मला माझ्या राजकीय भवितव्याबाबत वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यथा व्यक्त केली आणि पक्षाला इशाराही दिला.
प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता म्हणून राज्याच्या अनेक जिल्ह्य़ांमधून मला बोलावणे येते. तेथे माझे स्वागत होते, माझे कार्यक्रम होतात. पुण्यात मात्र पक्षाकडून सातत्याने उपेक्षा होते, अशी तक्रार गाडगीळ यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षाने शुक्रवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेतही माझे नाव नव्हते आणि पत्रिकेद्वारेच मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले असे सांगून गाडगीळ यांनी उपेक्षेची इतरही अनेक उदाहरणे यावेळी दिली. अशाच प्रकारे शहर काँग्रेसकडून उपेक्षा होत राहिली, तर मला माझ्या राजकीय भवितव्याबाबत वेगळा विचार करण्याची वेळ येईल, असेही ते म्हणाले.
पक्षाने सांगितले, तर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याचीही माझी तयारी आहे, असे सांगून ते म्हणाले की, पक्षाचा जनाधार पुण्यात सातत्याने कमी होत असून महापालिकेत सत्ताधारी असलेला पक्ष आज तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
संमिश्र सरकारे नकोतच
संमिश्र सरकारांच्या पद्धतीबाबतही गाडगीळ यांनी यावेळी त्यांची निरीक्षणे मांडली. संमिश्र सरकारमध्ये असलेल्या नेतृत्वधारी पक्षाला निर्णय घेण्यात अनेक मर्यादा येतात, तसेच नेतृत्वधारी पक्षाला अनेकदा तडजोडीही कराव्या लागतात. त्याबरोबरच सहकारी पक्षांच्या चुका व अपयशाचे खापर सरकारवर फोडले जाते आणि कालांतराने सरकार कमकुवत होते, असे गाडगीळ म्हणाले. संमिश्र सरकारमुळे नोकरशाही आक्रमक होते असाही अनुभव आहे. सातत्याने अस्थिरतेची टांगती तलवार राहिल्यामुळे त्याचा बाजारपेठेवरही परिणाम होतो. तसेच नेतृत्वधारी पक्षाची कार्यकर्ता यंत्रणाही कमकुवत होण्याचा धोका या पद्धतीत आहे आणि भावनांवर पक्ष विजयी होणे हे देशाच्या एकात्मतेसाठी धोक्याचे असते असेही ते म्हणाले.
उपेक्षा पुढेही सुरू राहिली, तर वेगळा विचार करावा लागेल
पुणे शहर काँग्रेसकडून सातत्याने मिळत असलेली उपेक्षेची वागणूक यापुढेही चालू राहिली, तर मला माझ्या राजकीय भवितव्याबाबत वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यथा व्यक्त केली आणि पक्षाला इशाराही दिला.
First published on: 10-03-2013 at 02:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant gadgil warns congress as he is ignored consciously by party