पुणे : देशातील प्रमुख महानगरांमध्ये नवीन घरांचा सरासरी आकार वाढू लागला आहे. मागील पाच वर्षांत घरांचा आकार सुमारे सात टक्क्याने वाढला आहे. दिल्लीत घरांचा आकार सर्वाधिक वाढला आहे. याचवेळी मुंबईत मात्र घरांचा सरासरी आकार कमी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अनारॉक रिसर्च’ने देशातील प्रमुख सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकता या शहरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, देशातील महानगरांमध्ये २०१८ ते २०२३ या कालावधीत नवीन गृहप्रकल्पांतील घरांचा सरासरी आकार सात टक्क्याने वाढला आहे. हा आकार २०१८ मध्ये सरासरी १ हजार १५० चौरसफूट होता. तो २०२३ च्या पहिल्या तिमाहीत १ हजार २२५ चौरसफुटांवर पोहोचला आहे.

हेही वाचा >>> अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर… पहिली गुणवत्ता यादी कधी?

ग्राहकांकडून दिवसेंदिवस मोठ्या आकाराच्या घरांना पसंत मिळत असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. देशातील सात महानगरांमध्ये नवीन घरांचा सरासरी आकार २०२१ मध्ये १ हजार १७० चौरसफूट तर २०२२ मध्ये १ हजार १८५ चौरसफूट होता. मागील पाच वर्षांत दिल्लीत घरांचा आकार सर्वाधिक वाढला असून, तो १ हजार २५० चौरसफुटांवरून १ हजार ७०० चौरसफुटांवर पोहोचला आहे. मुंबईत नवीन घरांच्या आकारात घट होत आहे. मुंबईतील घरांचा सरासरी आकार २०१८ मध्ये ९३२ चौरसफूट होता. तो चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत ७४३ चौरसफुटांवर आला आहे.

घरांचा सर्वाधिक सरासरी आकार

– हैदराबादमध्ये सर्वाधिक २ हजार २०० चौरसफूट आकार

– दिल्लीत आकार १ हजार ७०० चौरसफूट

– बंगळुरू आणि चेन्नईमध्ये आकार अनुक्रमे १ हजार ३०० आणि १ हजार १७५ चौरसफूट

– कोलकत्यात आकार १ हजार १५० चौरसफूट

– पुण्यात सर्वांत कमी १ हजार १३ चौरसफूट आकार

करोना संकटाआधी कमी आकाराच्या घरांना पसंती होती. त्यामुळे घरांचा आकार दरवर्षी कमी होत होता. करोना संकटाच्या काळात घरुन काम आणि अभ्यास सुरू झाल्याने मोठ्या आकाराच्या घरांना मागणी वाढू लागली.

– अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anarock research released report on property sector in seven major metros of india pune print news stj 05 zws
Show comments