पन्नास वर्षांपूर्वी ए. पी. जे. अब्दुल कलाम या तरुण दमाच्या शास्त्रज्ञाचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेत काहीशा अनपेक्षितपणे झालेला प्रवेश..विक्रम साराभाईंच्या नेतृत्वाखाली देशाचे पहिले अवकाशयान आकाशात झेपावण्याआधी धडपडय़ा शास्त्रज्ञांनी घेतलेले कष्ट..अमेरिकी बनावटीचे रॉकेट उडवण्याआधी सायकलवरून झालेला त्याचा प्रवास..आणि यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर नासाकडून आलेले चार रॉकेटपैकी एक रॉकेट सदोष असल्याचे सांगणारे पत्र!
२१ नोव्हेंबर १९६३ ला तिरुअनंतपुरममधील ‘थुंबा इक्व्ॉटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन’वरून पहिले ‘नायके-अपाचे रॉकेट’ उडवले गेले आणि अवकाश संशोधन क्षेत्रातील देशाच्या प्रवासाला नवे परिमाण मिळाले. या क्षणाचे साक्षीदार झालेल्या काही शास्त्रज्ञांनी आपले अनुभव गुरुवारी उलगडले. एम.एम. अॅक्टिव्ह सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भौतिक शास्त्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ इ. व्ही. चिटणीस, प्रमोद काळे, डॉ. उत्तम आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांनी आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणी सांगितल्या.
अवकाश शास्त्रातील संशोधनासाठी आर्थिक निधी हा गौण मुद्दा असल्याचे चिटणीस यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पहिल्या रॉकेटने झेप घ्यावी हेच ध्येय बाळगणारे आम्ही पगाराशिवायही काम करायला तयार होतो. कित्येक तरुण शास्त्रज्ञ अमेरिका आणि इंग्लंडमधील नोक ऱ्या सोडून अवकाश संशोधनात काहीतरी करून दाखवायचेच या जिद्दीपोटी परत आले होते. सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षरश: सकाळी ९ ते रात्री ३ वाजेपर्यंत हाताने ट्रान्सफॉर्मर्सची जोडणी करत असू. सुरुवातीला ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इस्त्रोच्या टीममध्ये ‘अतिरिक्त’ म्हणून घेण्यात आले होते. १९६३ च्या जानेवारी महिन्यात साराभाई, एचजीएस मूर्ती आणि मी गप्पा मारत बसलो होतो. त्या वेळी मूर्ती यांनी साराभाईंकडे कलाम या तरुण मुलाला टीममध्ये घ्यायलाच हवे, असा आग्रह धरला. मी देखील कलाम यांची कागदपत्रे पाहून मूर्ती यांना दुजोरा दिला. शेवटी साराभाईही तयार झाले आणि कलाम यांचा इस्त्रोप्रवेश झाला. या धडपडय़ा मुलाने पुढे अवकाश शास्त्रात प्रचंड काम केले.’’
अमेरिकी बनावटीच्या चार रॉकेट्सपैकी एक रॉकेट सदोष असल्याचे पत्र भारताने पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केल्यानंतर मिळाले होते. पण प्रक्षेपित केलेले रॉकेट ते नाही, हे कळल्यावर शास्त्रज्ञांचा जीव भांडय़ात पडल्याची आठवणही चिटणीस यांनी सांगितली.
काळे म्हणाले, ‘‘पहिल्या रॉकेटची जोडणी एका जुन्या चर्चमध्ये केली गेली. या ठिकाणापासून प्रक्षेपण स्थळ एक किलोमीटर अंतरावर होते. आमच्याकडे रॉकेटच्या वाहतुकीसाठी ‘इलेक्ट्रिकल स्पार्क फ्री’ वाहन नव्हते. म्हणून आम्ही एक रुपयाच्या भाडय़ावर आणलेल्या सायकलीवर रॉकेट लादून ते प्रक्षेपण स्थळावर नेले. यावर काही प्रसारमाध्यमांनी टीकाही केली होती.’’