वयाची ऐंशी ओलांडली असताना तरुणांनाही लाजविणारा उत्साह दाखवित ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी बुधवारी खास पाडगावकरी शैलीत सादर केलेल्या कवितांना रसिकांची भरभरून दाद मिळाली.. ‘जिप्सी’ व ‘सलाम’ बरोबरच ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं- आमचं सेम असतं’ ही कविता सादर करताना तरुण झालेल्या पाडगावकरांच्या छंदामध्ये जणू ही कविताही पुन्हा तरूण झाली..!
पाडगावकरांनी अनुवादीत केलेल्या राजहंस प्रकाशनच्या ‘कथारूप महाभारत’ या पुस्तकाचे प्रकाशन व अक्षरधाराच्या ४९२ व्या ‘माय मराठी शब्दोत्सवाच्या’ उद्घाटनाच्या कार्यक्रमात रसिकांनी ही अनुभूती घेतली. शब्दोत्सवाचे उद्घाटन पाडगावकरांच्या हस्ते, तर पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, ‘अक्षरधारा’च्या रसिका राठिवडेकर, कवयित्री म्डॉ. अरुणा ढेरे, मांडके हिअिरगच्या डॉ. कल्याणी मांडके आदी त्या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी पाडगावकरांची मुलाखत घेतली. त्यातील पाडगावकरांचे विविध किस्से व कवितांनी रसिकांना मनमुराद आनंद दिला. ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘प्रेम म्हणजे प्रेम’ या कवितांसह ‘यांचं असं का होतं कळत नाही’ ही कविता पाडगावकरांनी सादर केली.
अनुवादीत साहित्याबाबत पाडगावकर म्हणाले की, मीरा, तुलसीदास, सुरदास, कबीर आदींच्या साहित्याची मी भाषांतरे केली. भाषांतर करताना अनेकदा त्यातील गाणेपण जाते, ते मला घालवायचे नव्हते. त्यांच्या मूळ छंदामध्येच त्याची भाषांतरे झाली, हे त्याचे वैशिष्टय़ आहे. महाभारताचा अनुवाद करावा, असे मनात कधी नव्हते. पण, माजगावकरांच्या प्रस्तावानुसार ते केले. एकसारखे तेच ते करण्याचा मला कंटाळा येतो. त्यातून वेगवेगळे काहीतरी करीत असतो. ‘जिप्सी’ला साठ वर्षे होत असल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, जिप्सी फार वेगळी कविता होती. कोणत्याही प्रतिभावान माणसाला जिप्सीसारखे असावे लागते. अनुभवाला चिकटून राहिलो, तर तुम्ही त्याचे गुलाम होता.
कुंडल्या- बिंडल्या काही खरे नसते, खरी असते ती तुमची प्रेरणा. कविताही याच प्रेरणेतून निर्माण होते, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
मोरे म्हणाले की, महाभारतावर मराठीत सर्वाधिक लिहिले गेले. महाभारत व महाराष्ट्राचे एक नाते आहे. ते महाराष्ट्राच्या विद्वत्ततेचे क्षेत्र आहे. पाडगावकरांचा हा ग्रंथ महाभारताच्या त्या सांस्कृतिक संबंधांना उजाळा देणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसिका राठिवडेकर यांनी केले. डॉ. अरुणा ढेरे यांनी ‘कथारूप महाभारत’ या ग्रंथातील काही भागांचे अभिवाचन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा