रेषांच्या काही फटकाऱ्यांमधून निर्माण होणारा व भल्याभल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ‘कॉमन मॅन’ पुणेकरांसमोर शनिवारी पुन्हा एकदा खुद्द आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटला. हा अनमोल क्षण अनेकांनी डोळ्यात साठवला.
उद्योजक दत्तात्रय उर्फ बाळासाहेब पाथरकर यांच्या आत्मकथनपर ‘चालता चालता’ या पुस्तकाचे प्रकाशन लक्ष्मण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात लक्ष्मण यांनी कॉमन मॅन रेखाटला. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, कमला लक्ष्मण, प्रकाशक मंदार पंडित, पुस्तकाचे शब्दांकन करणारे हृषीकेश परंजपे, उद्योजक अशोक मोरे व ज्योती पाथरकर त्या वेळी उपस्थित होते.
पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर लक्ष्मण यांनी कॉमन मॅन साकारण्यास सुरुवात केली. हा मोलाचा क्षण पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे त्यांच्यावर स्थिरावले. अनेकजण मोबाईमधील कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा क्षण टिपत होते. नव्वदीत असलेल्या लक्ष्मण यांना चालता व बोलता येत नाही. त्यांचा एक हात निकामी झाला आहे. मात्र, दुसऱ्या थरथरत्या हातानी त्यांनी काही क्षणातच बोर्डवर कॉमन मॅनचे चित्र साकारले. दोन्ही हात मागे बांधून हसऱ्या चेहऱ्याने समोर पाहणारा कॉमन मॅन त्यांनी साकारला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना दाद दिली.
विशेष संपादकीय: कसे बोललात लक्ष्मण!
मनोगतात भटकर म्हणाले,‘‘हजारो शब्द जे करू शकत नव्हते, ते लक्ष्मण यांच्या एका व्यंगचित्राने करून दाखविले आहे. व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमात पाथरकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांसारख्या पुस्तकांचा अभ्यास झाला पाहिजे. त्यातून, यशस्वी उद्योजक घडले कसे, हे कळू शकेल.’’