पिंपरी : अंडाभुर्जी खाल्ल्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकूने वार केले. तसेच, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली. याप्रकरणी सुनील वासुदेव निशानकर (वय ४६, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील यांची जाधववाडी येथे अंडाभुर्जीची गाडी होती. तिथे आरोपींनी अंडाभुर्जी खाल्ली होती. त्याचे पैसे दिले नव्हते. दरम्यान सुनील यांनी त्यांची गाडी बंद केली. त्यानंतर आरोपींनी त्याच ठिकाणी अंडाभुर्जीची गाडी सुरु केली. सुनील हे आरोपींकडे अंडाभुर्जीचे पैसे मागण्यासाठी गेले. त्याचा राग आल्याने कांदा कापण्याच्या चाकूने सुनील यांच्यावर वार केले. तसेच सुनील यांना लाथाबुक्क्यांनी मारून जखमी
केले. सहायक पोलीस निरीक्षक खारगे तपास करीत आहेत.