राज्य सरकारच्या पैशांतून विश्व साहित्य संमेलनासाठी तीनदा परदेशवारी करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सदस्यांची अंदमानवारी फुकटात झाल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे महामंडळ सदस्याने प्रवासाचा निम्मा खर्च वैयक्तिक स्वरूपात करण्यासंबंधी महामंडळाने केलेला ठराव हा केवळ कागदोपत्रीच ठरला आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमान येथे ५ आणि ६ सप्टेंबर रोजी चौथे विश्व साहित्य संमेलन घेण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारने या संमेलनासाठी अनुदान दिले नव्हते. असे असतानाही साहित्य महामंडळ सदस्यांनी अंदमानवारी फुकटामध्ये पदरात पाडून घेण्याचे कसब साध्य केले आहे. आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर साहित्य महामंडळाच्या एका सदस्यानेच ही माहिती दिली. त्यामुळे महामंडळ सदस्यांनी प्रवासाच्या निम्म्या खर्चाचा भार उचलण्यासंबंधी केलेला ठराव हा ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ ठरला आहे.
मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी विश्व साहित्य संमेलन भरविण्याची कल्पना पुढे आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने अमेरिकेतील सॅनहोजे, सिंगापूर आणि दुबई येथे यापूर्वी झालेल्या तीन विश्व संमेलनांसाठी अनुदान दिले होते. पहिली दोन संमेलने झाली, तेव्हा साहित्य महामंडळाचे कार्यालय औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेकडे होते. तर, तिसऱ्या संमेलनाच्या वेळी मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख हे महामंडळाचे पदाधिकारी होते. जनतेच्या कररूपी पैशांतून सरकारने दिलेल्या अनुदानातून महामंडळ सदस्यांची परदेशवारी होत असल्याची टीका झाली होती. ‘जाऊ तर सारे नाही तर कोणीच नाही’ या महामंडळाच्या भूमिकेमुळे कॅनडा येथील टोरांटो आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका येथील जोहान्सबर्ग येथे ठरलेले संमेलन रद्द करण्याची वेळ आली होती. माध्यमांकडून होत असलेल्या टीकेची दखल घेत विश्व साहित्य संमेलनासाठी महामंडळ सदस्यांनी निम्म्या खर्चाचा भार उचलावा, असा ठराव महामंडळाने संमत केला होता. मात्र, हा ठराव बासनात गुंडाळून महामंडळ सदस्यांनी अंदमान दौरा फुकटामध्ये केला असल्याची बाब उघड झाली आहे.