पुणे : नाना पेठेत टोळीयुद्धाचा भडका उडाला. वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी दोघांवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.निखिल आखाडे (वय २९), अनिकेत दुधभाते (वय २७, दोघे रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील आंदेकर टोळी आणि सूरज ठोंबरे टोळीत वैमनस्य आहे. ठोंबरेचा साथीदार सोमनाथ गायकवाड याचे निखिल आखाडे, अनिकेत दुधभाते मित्र आहेत. सोमवारी सायंकाळी आखाडे आणि दुधभाते गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे निघाले होते. त्या वेळी आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत आखाडे आणि दुधभाते गंभीर जखमी झाले.

हेही वाचा>>>पुणे: राजकीय व्यग्रतेतून वेळ काढून शरद पवारांनी पाहिले ‘संशयकल्लोळ’

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या तीन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले, असे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andekar gang attacked two people in pune print news rbk 25 amy