पुणे : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डाएट) या संस्थेतील अनीत अभिषेक या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याने वसतिगृहाच्या खोलीतील पंख्याला गळफास लावून घेतला. डाएट ही संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील संस्था आहे. अनीत हा ‘डाएट’मध्ये उपयोजित रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत होता. तो अत्यंत हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थी होता. १७ एप्रिल रोजी त्याचे मित्र सकाळपासूनच त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सायंकाळी साडेआठ वाजता त्याचे मित्र त्याच्या खोलीकडे गेले.

खोली आतून बंद असल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी अनीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने संस्थेच्या रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर नियमानुसार शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांना व पोलीस प्रशासनास याची तत्काळ माहिती देण्यात आली. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन त्याचा लॅपटॉप, मोबाइल, टॅब्लेट अशी साधने ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांना एक चिठ्ठीही आढळून आली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

प्राथमिक तपासणीत अनीतला नैराश्याची लक्षणे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी २१ एप्रिल रोजी शोकसभा घेण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून कोणतीही अडचण असल्यास संस्थेतील अधिकारी, प्राध्यापकांशी, तसेच मानसिक तणावाशी संबंधित समस्येसाठी संस्थेतील समुपदेशकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले, अशी माहितीही देण्यात आली.