लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : अहिल्यानगर जिल्ह्यात अत्याचाराला विरोध करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचा खून करण्यात आला. अंगणवाडी सेविकेच्या खून प्रकरणी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अंगणवाडी शिक्षिका, मदतनीसांना सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी द्यावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेने केली. त्यासाठी येत्या सोमवारी (४ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, बंडगार्डन पोलिसांनी महिला अत्याचाराच्या गंभीर प्रश्नाची गंभीर दखल घेण्याऐवजी कायदा आणि सुव्यवस्थेची सबब सांगून निवेदन देणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी कारवाईची नोटीस बजावली आहे.

अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस विविध शासकीय योजनांमध्ये सहाय करतात. देशाच्या विकासासाठी त्या काम करतात. यापूर्वी अंगणवाडी सेविकांना अत्याचाराच्या घटनांना सामोरे जावे लागले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावातील अंगणवाडी सेविकेवर आरोपी सुभाष बडे याने २४ ऑक्टोबर रोजी अत्याचाराचा प्रयत्न केला होता. अत्याचाराला विरोध करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे भिंतीवर डोके आपटून बडे याने खून केला होता. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी सेविकेचा मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. अशा घटना रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सुरक्षेची भाऊबाीज ओवाळणी देण्यात यावी, असे निवेदन अंगणवाडी कर्मचारी सभेकडून येत्या सोमवारी (४ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना देण्यात येणार होते. अंगणवाडी कर्मचारी सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घटनेचा निषेध करण्यात येणार होता.

आणखी वाचा-एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट, दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज चोरीच्या घटनांमध्ये वाढ

याबाबतची माहिती देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या पदाधिकारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गेल्या. तेव्हा अशा प्रकारचे आंदोलन करता येणार नाही. आंदोलन केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बंडगार्डन पोलिसांनी पदाधिकारी शैलजा चौधरी, वैशाली गायकवाड, मनीषा गाडे, अनिता आवळे यांना दिली. अंगणवाडी सेविकांना सुरक्षेची ओवाळणी देण्याऐवजी कारवाईची नोटीस बजाविणे योग्य नाही, असे अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक आदेश वर्षभर लागू असतात. अंगणवाडी सेविकांना सुरक्षेची हमी देण्याऐवजी त्यांना नोटीस बजावणे योग्य नाही. येत्या सोमवारी (४ नोव्हेंबर) सकाळी साडेअकरा वाजता अंगणवाडी सेविका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी मागणार आहेत, असा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला आहे. -नितीन पवार, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anganwadi workers murder case in ahilyanagar notice of action to anganwadi workers pune print news rbk 25 mrj