पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्या वीजजोडणीअभावी अंधारात असल्याचे समोर आले आहे. १ हजार १८१ अंगणवाड्यांना वीजजोडणी देण्यासाठी जुलैमध्ये निधी देऊनही नोव्हेंबरपर्यंत केवळ २६८ अंगणवाड्यांनाच वीज जोडणी झाली आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या वीजजोडणीबाबत आमदार सुनील टिंगरे, लक्ष्मण जगताप, संग्राम थोपटे आणि ॲड. राहुल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अंगणवाड्यांना वीजजोडणी मिळाली नसल्याची कबुली दिली. त्यामुळे अंगणवाड्यांच्या वीजजोडणीचे वास्तव समोर आले.
हेही वाचा- पुणे : रखडलेले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अखेर जाहीर
पुणे जिल्हा परिषदेमार्फत असर्व अंगणवाडी केंद्रांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंगणवाडी सक्षमीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंचर्गत अंगणवाडी केंद्रांच्या सर्वेक्षणात १ हजार १८१ अंगणवाड्यांना वीज उपलब्ध नसल्याचे जून २०२२मध्ये निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा पिरषदेने प्रती अंगणवाडी तीन हजार रुपये या प्रमाणे जुलैमध्ये वीजजोडणीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले. त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत २६८ अंगणवाड्यांची वीजजोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ठिकाणी वीजजोडणीची प्रक्रिया जानेवारी २०२३मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.
तसेच काही अंगणवाड्यांचे पूर्वीचे वीजदेयक थकित असल्याने त्यांना नवीन वीजजोडणी न देता थकित वीजदेयके ग्रामपंचायतीमार्फत भरण्याची कार्यवाही सुरू आहे. देयक भरल्यानंतर जुने मीटर पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहेत. वीज जोडणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ग्रामपंचायतींपैकी ११७ ग्रामपंचायतींच्या खात्यावर निधी हस्तांतरित होऊ शकला नसल्याने त्यांच्याकडून अद्ययावत बँक खात्याबाबत माहिती घेऊन पुन्हा निधी पाठवण्याची कार्यवाही करण्यात आल्याचेही लोढा यांनी नमूद केले.