छाती आणि पाठीतील वेदनांनी ग्रासलेल्या अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्याची गरज निर्माण झाली. या तरुणाच्या मुख्य धमनीत तब्बल ९९ टक्के अडथळे (ब्लॉकेज) आढळून आले. विशेष म्हणजे, या तरुणाला धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा अशी कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे हृदयविकार तरुणांना होत नाही या विचाराने गाफील न राहता कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
खराडी येथील मणिपाल रुग्णालयात या तरुणावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. हृदयविकार तज्ज्ञ डॉ. भूषण बारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले. डॉ. बारी म्हणाले,की रुग्ण उपचारांसाठी आला त्यावेळी केलेल्या इसीजी मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे दिसून आले. अँजिओप्लास्टी करण्यापूर्वी त्याला रक्त पातळ करणारी औषधे, प्राथमिक उपचार दिले, मात्र फारसा उपयोग झाला नाही. त्याचे हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे डीसी शॉक देऊन अँजिओग्राफी केली असता एक प्रमुख धमनी ९९ टक्के बंद असल्याचे दिसून आले. इतर तपासण्यांनंतर होमोसिस्टाइनची पातळी सरासरीच्या १० पट अधिक असल्याचे दिसून आले. सहसा ही पातळी वाढण्याचे कारण धूम्रपान, मद्यपान, जीवनसत्त्वांची कमतरता असे असते. मात्र, या तरुणाला अशी व्यसनेही नाहीत, असेही डॉ. बारी म्हणाले.
हेही वाचा : रामदास कदम यांनी केलेल्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात फोटोला जोडे मारो आंदोलन
आता तरुण वयातही हृदयविकार
अलीकडे तरुण वयात हृदयविकार हे अत्यंत सर्वसाधारण झाले आहे, त्यामुळे आपल्याला हृदयविकार शक्य नाही असे म्हणून लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन डॉ. बारी यांनी केले आहे. छातीत तीव्र जळजळ, पाठ दुखणे, अतिरिक्त प्रमाणात थकवा, घाम येणे, धाप लागणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. किमान ईसीजी काढून घ्या, असा सल्ला डॉ. बारी यांनी तरुणांना दिला.
हेही वाचा : पुणे शहरात ई-बाईक धावण्याचा मार्ग मोकळा ; प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता
पालकांनी हे पाहावे
- मुलांच्या स्क्रीनटाईमवर लक्ष ठेवा.
- त्याऐवजी मैदानी खेळ, व्यायाम यासाठी प्रोत्साहन द्या.
- वजनावर नियंत्रण ठेवण्याबाबत आग्रही राहा.
- प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, शीतपेये, जंक फूड सेवन टाळा.