बारामती : श्रीमंती ही केवळ पैशातूनच मोजली जात नाही, पैसा व शरीरासोबत मनाची श्रीमंती तितकीच महत्वाची आहे. श्रीमंती मिळविणे सोपे असते पण ती टिकवणे गरजेचे आहे, कुटुंबाला आर्थिक साक्षरता शिकविणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादन व्याख्याते अनिकेत यादव यांनी केले. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित प्रतिबिंब व्याख्यानमालेमध्ये तुम्हाला श्रीमंत व्हायचय का….! या विषयावर काल शनिवारी अनिकेत यादव यांनी बारामतीकरांशी संवाद साधला.
पैशाने श्रीमंत होण्यासोबतच मनानेही श्रीमंत असणे गरजचे आहे असे सांगून यादव म्हणाले, श्रीमंती मिळविता येते पण ती टिकवून ठेवणे गरजेचे आहे. तीन पिढ्यांपर्यत श्रीमंती बहुसंख्य वेळा टिकते पण काहीही काम न करणा-या कुटुंबाची श्रीमंती टिकत नाही. पैसे मिळविणे व ते टिकविणे ही एक कला आहे.
आपण आपल्याला उत्पन्न नाही वाढविता आले तरी चालेल पण तुमचा खर्च कमी करण्याकडे लक्ष केंद्रीत करा. आपण खर्चाला प्रचंड वाटा निर्माण करतो, त्या मुळे अनेकदा कुटुंबियांमधील संबंधही ताणले जातात. गरज व इच्छा यातील फरक ओळखता यायला हवा. खर्च कमी करुन उत्पन्न वाढविणे, मिळालेल्या उत्पन्नाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे व त्यातून पुन्हा उत्पन्न वाढविल्यास लवकर श्रीमंत होता येईल. जेवढी गुंतवणूक चांगली होईल, तितके भविष्यातील अपेक्षा पूर्ण होतात.
केवळ स्थावर मालमत्तेत गुंतवणूकीचाच पर्याय न निवडता इतर पर्यायही शोधले पाहिजेत, जेणेकरुन उत्पन्न वाढू शकते. अनुत्पादक गोष्टींसाठी अजिबात कर्ज घेऊ नका, अन्यथा कर्जाच्या खाईत तुम्ही जाऊ शकाल. अनावश्यक कर्ज लवकर फेडून टाका. हिशेब लिहायची सवय प्रत्येकाने लावून घ्यायला हवी. त्या मुळेही आपण कोठे आहोत, हे आपले आपल्याच समजेल.