महापालिकेची निवडणूक लढवताना मिळकत कर थकीत असतानाही कर भरल्याच्या बनावट पावत्या सादर करून निवडणूक लढवल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि त्यांची पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
रेश्मा भोसले यांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रभाग क्रमांक १३ ब मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे समाधान शिंदे यांचा पराभव केला होता. निवडणुकीचा उमेदवारीअर्ज भरताना भोसले यांनी मिळकत कराची बाकी नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र दिले होते. प्रत्यक्षात निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांनी बाकी असलेला कर भरला व तो भरताना एक महिन्यापूर्वीची कर भरल्याची बनावट पावती सादर केली, असे शिंदे यांचे म्हणणे आहे. आमदार भोसले यांनी या प्रकरणात पदाचा गैरवापर केला, असाही शिंदे यांचा आरोप आहे. या प्रकरणी शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून याचिकेवरील सुनावणी न्यायालयासमोर सुरू आहे.
शिंदे तसेच महापालिकेतील मनसेच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनुसार महापालिका स्तरावर या प्रकरणाची चौकशी झाली होती. या चौकशीत भोसले यांना कर भरल्याची एक महिन्यापूर्वीची पावती देण्यात आल्याचा अहवालही अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे. हा अहवाल आल्यानंतर महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
‘विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे विद्यमान आमदारांना अटक करण्यापूर्वी विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार परवानगी घेऊन शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी भोसले यांना दुपारी अटक केली व त्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली,’ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले.
आमदार अनिल भोसले यांच्यासह पत्नी रेश्मा यांना अटक व सुटका
निवडणुकीचा उमेदवारीअर्ज भरताना भोसले यांनी मिळकत कराची बाकी नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र दिले होते. प्रत्यक्षात निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांनी बाकी असलेला कर भरला.
आणखी वाचा
First published on: 13-12-2013 at 02:47 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil bhosale reshma bhosale pmc election property tax