पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची तस्करी करणारा कैदी ललित पाटील फरार झाला होता. त्यानंतर ससून रुग्णालयात अनेक कैदी महिनोमहिने उपचाराच्या नावाखाली तिथे ठाण मांडून बसल्याचे समोर आले होते. यावरून गदारोळ उडाल्यानंतर ससून रुग्णालयाने या कैदी रुग्णांची तपासणी करून त्यातील १२ जणांची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. त्यात माजी आमदार अनिल भोसले यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ससून रुग्णालयात येरवडा कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी पाठविले जाते. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ललित पाटील हाही काही महिने रुग्णालयात उपचार घेत होता. रुग्णालयात बसून तो तस्करीचे जाळे चालवत होता. त्याने रुग्णालयातून पलायन केल्याने रुग्णालयातील सावळा गोंधळ समोर आला होता. त्यानंतर रुग्णालयातील कैदी रुग्णांचा अहवाल तातडीने सादर करण्यास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले होते.

हेही वाचा – शरद पवार यांची दसऱ्याला पुण्यात सभा?

ससून रुग्णालयाने त्रिसदस्यीय समिती नेमून प्रत्येक कैद्याचा वैद्यकीय अहवाल तपासला. त्यात तो कधीपासून रुग्णालयात आहे, त्याच्यावर आधी कोणते उपचार केले, पुढे कोणते उपचार केले जाणार आहेत, त्याची सध्याची वैद्यकीय स्थिती कशी आहे आणि त्याला रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता आहे का, आदी बाबींची तपासणी केली. हा अहवाल त्रिसदस्यीय समितीने ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे सोमवारी सायंकाळी सादर केला. अधिष्ठात्यांनी हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

दरम्यान, हा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्याआधीच ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली ठाण मांडून बसलेल्या १२ कैद्यांची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील आरोपी माजी आमदार अनिल भोसले, गुंड रुपेश मारणे, बलात्कार प्रकरणातील आरोपी हेमंत पाटील, प्रवीण राऊत आणि प्रकाश चावला यांच्यासह १२ कैद्यांची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी झाली. हे कैदी मागील अनेक महिने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल होते.

हेही वाचा – जम्मू काश्मीरमधून बनावट शस्त्र परवाना मिळवून पुण्यात सुरक्षारक्षकाची नोकरी करणारे आठजण अटकेत; पिस्तूल, बंदुकी जप्त

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्यांबाबतचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने माझ्याकडे सादर केला. हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. अहवाल गोपनीय असल्याने त्याबाबत अधिक माहिती देता येणार नाही. – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

ससूनमधील कैद्यांच्या कक्षात १६ कैदी होते. या सर्व कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानुसार अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार १६ पैकी चारजणांना अद्याप रुग्णालयात उपचारांची गरज दिसून आली आहे. त्यामुळे हे चार कैदी वगळून इतरांना पुन्हा कारागृहात पाठवून देण्यात आले आहे. – सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे</p>

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil bhosle along with 12 prisoners back in jail the treatment of prisoners in sassoon finally ended after a few months pune print news stj 05 ssb