पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय मागील आठवड्यात निवडणुक आयोगामार्फत घेण्यात आला होता. त्या निर्णयानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाला चिन्ह लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार गट लवकरच काँग्रेस पक्षात विलीन होणार अशी चर्चा आज सकाळपासून सोशल मीडियावर सुरू होती. यावर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल देशमुख यांच्यासह राज्यातील अन्य नेतेमंडळी सोबत बैठक झाली.
आणखी वाचा-पिंपरी : महापालिकेची ११०० जाहिरात फलकधारकांना नोटीस; दिला ‘हा’ इशारा
या बैठकीनंतर आमदार अनिल देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लवकरात लवकर चिन्ह मिळावं, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. जेणेकरून आपल्याला प्रचार करण्यास सुरुवात करता येईल. तसेच आम्ही कोणासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्या संदर्भात चर्चा देखील झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.