ई-बुक या आधुनिक माध्यमाचा सध्या गवगवा असला, तरी पुस्तक वाचनाला पर्याय नाही, अशी भावना ज्येष्ठ प्रकाशक आणि ‘मेहता पब्लिशिंग हाउस’चे प्रमुख अनिल मेहता यांनी बुधवारी व्यक्त केली.
पुस्तकविक्री व्यवसायाचा अर्धशतकाचा अनुभव गाठीशी असलेले आणि प्रकाशनाची चार दशकांची यशस्वी वाटचाल करणारे अनिल मेहता गुरुवारी (३ मार्च) वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्या निमित्ताने मेहता यांनी मुद्रित ग्रंथव्यवसायाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगितले. मूळचे निपाणीचे असलेले अनिल मेहता शिक्षणासाठी पुण्यात आले. बी.कॉम. झाल्यावर वेगळे काही करण्याच्या उद्देशातून कोल्हापूरला आले. देवचंद शहा यांनी जागा मिळवून देण्यापासून ते भांडवल उभे करण्यापर्यंतची मदत केली. १९६५ मध्ये ‘अजब पुस्तकालय’ या दुकानाद्वारे पुस्तक विक्रीमध्ये उतरलेल्या मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाउसच्या माध्यमातून प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात भरारी घेतली आहे.
वाचकांना पुस्तकांबद्दल आकर्षण आहे. त्यामुळे ई-बुकचा कितीही गवगवा झाला, तरी पुस्तकांच्या खपामध्ये सातत्याने होत असलेली वाढ हे वाचन संस्कृती अबाधित असल्याचे द्योतक असल्याचे निदर्शक आहे, असे सांगून अनिल मेहता म्हणाले, पुस्तक हे केव्हाही, कोठेही वाचता येते. ‘माझ्या संग्रहामध्ये या लेखकाचे पुस्तक आहे,’ असे वाचक अभिमानाने सांगतात. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही, तरी पुस्तके वाचनाचा आनंद देतात. मी व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा ललित साहित्याची पुस्तके खपत असत. मात्र, वाचकांचा कल बदलत असून कादंबरी, आत्मचरित्र आणि अनुवादित साहित्याबरोबरच स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवरील पुस्तकांना मागणी वाढत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा