पुणे शहराला सातत्याने भेडसावत असलेली सार्वजनिक वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने फक्त वाहतूक सुधारणेचा र्सवकष आराखडा करावा, अशी सूचना खासदार अनिल शिरोळे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत केली. पुणे शहराच्या ज्या योजनांचा केंद्राकडे पाठपुरावा करायचा आहे त्यासाठी मी सक्रिय राहीन, असेही शिरोळे यांनी या वेळी सांगितले.
खासदार शिरोळे यांनी शुक्रवारी महापालिकेत येऊन आयुक्त विकास देशमुख यांची भेट घेतली. आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, पक्षाचे महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे तसेच पक्षाचे सर्व नगरसेवक या बैठकीत उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने वचननाम्यात केलेल्या घोषणेप्रमाणे देशातील शंभर शहरांचा समावेश स्मार्ट सिटी या योजनेत केला जाणार आहे. या योजनेत पुण्याचाही समावेश व्हावा यासाठी शिरोळे प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने शहराचा गतिमान विकास करण्यासाठी पुण्याच्या कोणत्या विषयांचा पाठपुरावा केंद्राकडे करणे आवश्यक आहे, याची चर्चा शिरोळे यांनी या बैठकीत केली. घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूल, पर्वती येथील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प, मेट्रो प्रकल्प या आणि अन्य प्रकल्पांच्या सद्य:स्थितीची माहिती शिरोळे यांनी या वेळी घेतली. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या विषयांची माहिती शिरोळे यांना या वेळी देण्यात आली.
पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडवणे आवश्यक असून त्यासाठी र्सवकष आराखडा करण्याची सूचना या वेळी शिरोळे यांनी केली. केंद्र सरकारकडे विविध योजनांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होईल व या निधीतून विविध प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा या बैठकीत आमदार बापट आणि मिसाळ यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा