पिंपरी : वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहरातील नागरी सुविधा निर्मितीचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची १३ एकर जमीन महापालिकेने मोबदला घेऊन ताब्यात घ्यावी. या जमिनीवर प्रस्तावित स्पाईन रस्ता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), पाण्याच्या टाक्या, अग्निशमन केंद्र विकसित करण्यासह वाढीव नागरी सुविधा उभारण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री पवार यांनी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या स्पाईन रस्ता आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा कामांचा ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून आढावा घेतला. महसूल व पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पिंपरी महापालिका आयुक्त शेखर सिंह, पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

हेही वाचा : पिंपरी : श्रीमंत महापालिकेची १३९ जणांनी नाकारली नोकरी, नेमके कारण काय?

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या क्षेत्रात विविध उद्योग घटकांसह नवीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्याही येत आहेत. त्यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर महापालिकेमार्फत स्पाईन रस्ता आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. विकास आराखड्यात ताथवडे येथील जागेचा समावेश करण्यात आला आहे. या जमिनीवर नागरी सुविधांची काही आरक्षणे टाकण्यात आली आहेत. मध्यवर्ती ठिकाणची आवश्यक असणारी जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास पशुसंवर्धन विभाग सकारात्मक आहे. त्यामुळे महापालिकेला आवश्यक असणाऱ्या नागरी सुविधांसाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणासंदर्भातील प्रस्ताव तातडीने पशुसंवर्धन विभागास सादर करावा. पशुसंवर्धन विभागामार्फत जमिनीचे मूल्यांकन करून मोबदला निश्चित करण्यात येईल. हा मोबदला भरून महापालिकेने जमीन लवकरात लवकर ताब्यात घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये अपघाताच सत्र थांबता थांबेना!; निगडित चारचाकीने दोघांना दिली धडक

वाहतूक कोंडी सुटणार

ताथवडे परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी वाल्हेकरवाडी चौक ते औंध-रावेत रस्त्यावरील डेअरी फार्म चौक ताथवडे पर्यंतचा ४५ मीटर स्पाईन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. जमीन ताब्यात आल्यास रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

स्पाईन रस्ता, उड्डाणपूल, सांडपाणी प्रकल्प आणि इतर विकासकामांसाठी १३ एकर जागेचा प्रस्ताव आहे. आवश्यकतेनुसार या क्षेत्रफळात वाढ करून नवीन प्रस्ताव पाठवावा. महापालिकेने या जागेच्या वापराचा सविस्तर आराखडा तयार करावा, असे पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal husbandry department s 13 acres land transferred to pimpri chichwad municipal corporation pune print news ggy 03 css