सुटीत गावाला जायचे किंवा घरी समारंभ आहे, पाहुणे येणार आहेत.. अशावेळी ओळखीच्यांना विनंती करून कुत्र्यांच्या किंवा पक्ष्यांच्या खाण्यापिण्याची तात्पुरती सोय करायची, असा प्रघात अनेक वर्षे होता. जागा, वेळ या गणितांमध्ये शेजाऱ्याच्या कुत्र्याची थोडीफार काळजी घेणे शक्यही होते. कालौघात जागेची आणि वेळेची गणिते, ‘शेजारी’ ही संकल्पना हे सगळेच बदलत गेले. प्राणी पाळण्याच्या संकल्पना आणि त्या अनुषंगाने पाळलेल्या प्राण्याच्या गरजाही

बदलल्या आणि सुट्टय़ांमध्ये प्राण्यांची जबाबदारी कुणी उचलायची असा प्रश्न पडू लागला. सुटय़ा आणि सणासुदीच्या गडबडीत घरातले ‘श्वानुले’ किंवा मांजरे, पक्षी यांची काळजी घेण्याची जबाबदारी ‘पेट बोर्डिग’ किंवा पेट हॉस्टेल्स उचलत आहेत.

जगात सर्वाधिक कुत्री पाळणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा क्रमांक लागत असल्यामुळे आता पेट हॉस्टेल्स ही फक्त एक सुविधा न राहता गरज बनू पाहात आहे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे पाळीव प्राण्यांसाठी सुविधा देणारी हॉस्टेल्स, पाळणाघरे, बोर्डिग्सना प्राणीप्रेमींकडून मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सध्या येऊ घातलेल्या दिवाळीसाठी पेट बोर्डिगमध्ये पशूपालकांची गर्दी होत आहे. ‘पेट सव्‍‌र्हिस इन्डस्ट्री’ मधील पेट हॉस्टेल्सचा हा ट्रेंड इतका वाढला, की आता या बोर्डिगसाठीही किमान माहिनाभर आधी नोंदणी करावी लागत आहे.

मांजरे आणि पक्ष्यांसाठीही बोर्डिग्स..

मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी अगदी १० ते १२ प्राण्यांपासून ते १०० प्राण्यांची एका वेळी सोय करणारी पेट बोर्डिग्स आहेत. कुत्र्यांबरोबरच मांजरे आणि पक्ष्यांसाठीही हॉस्टेल्सच्या सुविधा उपलब्ध आहेत. कुत्र्याच्या प्रजातीनुसार त्याला ठेवण्याचे भाडे ठरते. साधारण ४०० रुपये दर दिवशी ते अगदी दोन हजार रुपये दर दिवशी मोजूनही प्राणीप्रेमी पेट हॉस्टेल्सकडे धाव घेत आहेत. ऑनलाईन, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणीच्या सुविधाही आहेत. प्राण्यांना घरून नेणे आणि ठरलेल्या दिवशी आणून सोडण्याची सोयही काही हॉस्टेल्स करतात.

काळजी काय घ्यावी?

  • पेट इन्डस्ट्री ही अजूनही भारतात काही प्रमाणात अनियंत्रितच आहे. ‘डॉग बोर्डिग’ सुरू करण्यासाठी फारशा परवानग्या घेण्याची आवश्यकता नाही आणि मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाणही जास्त असल्यामुळे हा व्यवसाय झपाटय़ाने वाढतो आहे. त्यामुळे काहीवेळा फसवणुकीचे अनुभवही प्राणीपालकांच्या गाठीशी येतात. त्यामुळे प्राण्यांना बोर्डिगमध्ये सोडण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे.
  • बोर्डिगमध्ये स्वच्छता, सुरक्षा यांची खातरजमा करावी.
  • जीपीएस कॉलर सारख्या सुविधा असतील तर त्याला प्राधान्य द्यावे.
  • शुल्क आणि त्यामध्ये नेमक्या कोणत्या सुविधा दिल्या जातात याची माहिती घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी वेगळे खाणे, ग्रुमिंग, वाहतूक यांचे स्वतंत्र शुल्क आकारले जाते.
  • प्राण्याला फिरण्यासाठी पुरेशी जागा आहे याची खातरजमा करावी.
  • कोणते खाणे दिले जाते, ते आपल्या कुत्र्याला किंवा मांजराला चालते का याची माहिती घ्यावी.
  • अत्यावश्यक किंवा प्राथमिक उपचारांची सुविधा आहे का याची खातरजमा करावी.
  • प्राणी बोर्डिगमध्ये ठेवण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करून तो निरोगी असल्याची खातरजमा करावी.
  • प्राण्यांचे लसीकरण केलेले असावे.
  • पिसवा, गोचिड नाहीत याची खात्री करावी.
  • मांजरे एकत्र कुत्र्यांच्या पिंजऱ्यांपासून लांब ठेवण्यात येत आहेत का याची खात्री करावी.
  • फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करता येऊ शकते.

Story img Loader