शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून देणाऱ्या छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित एका अॅनिमेशनपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘प्रभो शिवाजी राजा’ हा चित्रपट यंदाच्या उन्हाळाच्या सुट्टीत रसिकांच्या भेटीला येणार आहे.
‘प्रभो शिवाजी राजा’ केवळ १०० मिनिटांचा आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या निवेदनातून हा चित्रपट उलगडत जातो. मुघलांचा काळ, शिवरायांचा जन्म, बालपण, स्वराज्याची प्रतिज्ञा, महत्त्वाच्या लढाया आणि राज्याभिषेक यांसारख्या महत्त्वाच्या घटना चित्रपटामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. चित्रपटातील गाणी शंकर महादेवन आणि स्वप्निल बांदोडकर यांनी गायली आहेत. भरत बलवली यांनी संगीत तर नंदू घाणेकर यांनी पाश्र्वसंगीत दिले आहे.
बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर यांनी केलेल्या संशोधनावर चित्रपटाची कथा साकारली असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक नीलेश मुळे यांनी सांगितले. शिवकालीन कागदपत्रे, पत्रव्यवहार, बखरी यांचा आधार घेऊन निनाद बेडेकर यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.