आपल्या देशाला विविध नामवंत विद्यापीठांची व संबंधित क्षेत्रातील विद्वानांची परंपरा लाभलेली आहे. यात एक लक्षणीय गोष्ट अशी, की बी.ए., बी.एस्सी., बी. कॉम.सारख्या सर्वमान्य पदव्यांव्यतिरिक्त इतर शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. या साऱ्या पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत व्यावसायिक शिक्षण हे तर अतिशय दुर्लक्षित राहिलेले दिसून येत आहे. मात्र आजची आर्थिक व तांत्रिक भरभराट पाहता व्यावसायिक शिक्षण ही काळाची खरी गरज आहे. हे शिक्षण उपलब्ध नसल्याने अशा क्षेत्रात असलेली मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यात मोठीच तफावत आहे. ही दरी कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची गरज आहे.
राष्ट्रीय ज्ञान आयोग असेल वा विद्यापीठ अनुदान आयोग, शिक्षण क्षेत्रातील या उच्चतम संस्थांनी शिक्षणाच्या उपलब्धतेनंतर वा उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी वाढविण्याच्या उद्देशानंतर व्यावसायिक शिक्षणावर भर दिलेला दिसून येतो. व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन अकराव्या पंचवार्षिक योजनेत तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. रचनात्मक व सकारात्मक बदल घडवण्यासाठी आमूलाग्र बदलाची व ती स्वीकारण्यासाठी आवश्यक त्या मानसिकतेची गरज आहे आणि हे होण्याकरिता नवीन कौशल्य विकसित व ते शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची निर्मिती करणे गरजेचे आहे.
पुणे- अॅनिमेशन गेमिंगचे नवे डेस्टिनेशन
या नव्या संस्था जागतिक दर्जाची गुणवत्तापूर्ण उत्पादन तसेच उद्योग व्यवसायांसाठी कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ, नव्या पद्धती विकसित करून त्यानुसार शिक्षण देणाऱ्या असाव्यात. अशा अधिकाधिक संस्था उभारण्याची आज गरज आहे, असे जागतिक दर्जाचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात उभ्या राहिल्या आहेत. ज्यात डीएसके सूप इन्फो कॉम, सृजन, फ्रेमबॉक्स अशा केवळ अॅनिमेशन आणि गेमिंगचे शिक्षण देणाऱ्या संस्थांसोबत एमआयटी, भारती विद्यापीठ, टिळक विद्यापीठ अशा खासगी विद्यापीठांचाही समावेश आहे.
अॅनिमेशन व गेमिंगसोबतच, मीडिया अँड एन्टरटेन्मेंट क्षेत्रात मॅपिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर गार्डियन कॉपरेरेशनने सर्वप्रथम केला. पुण्यातच नव्हे तर देशात सर्वप्रथम या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यावरून पुणे अॅनिमेशन, डिझाइनसोबतच त्या संबंधाने असलेले इतर तंत्रज्ञान स्वीकारण्यातदेखील पुणे आघाडीवर आहे, हे यावरून स्पष्ट होते. पुण्यात तयार झालेल्या कुशल मनुष्यबळासाठी हे एकप्रकारे संधींनी भरलेले डेस्टिनेशन ठरू शकेल.
राज्यात हे अॅनिमेशन गेमिंगचे क्षेत्र वाढते आणि सर्वार्थाने विकसित होत आहे. मात्र त्याला मधील काळात थोडीशी मंदीची खीळ बसलेली जाणवली. ही खीळ शिक्षण क्षेत्रातील केवळ या विषयाला बसली असे नाही, तर व्यवस्थापन व अभियांत्रिकीसारख्या विषयाच्या अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनादेखील या परिस्थितीची झळ सोसावी लागली. हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही वर्षांत हे चित्र आणखी गतीने बदलेल, असा आशावाद ‘सृजन’चे संचालक संतोष रासकर यांनी व्यक्त केला आहे.
अॅनिमेशन व गेमिंग क्षेत्रातील पुण्यातील घोडदौडीचा विचार केला असता असे लक्षात येईल, की २०१२मध्ये भारतात चार अॅनिमेशनपटांची निर्मिती झाली. त्यातील दोन अॅनिमेशन चित्रपटांच्या निर्मितीत पुण्यातील शैक्षणिक संस्थांचा व उद्योगांचा भरीव सहभाग होता. या अॅनिमेशनपटांची गुणवत्ता एवढी चांगली होती, की या चित्रपटांनी चक्क ऑस्कर पुरस्कारासाठीचे नॉमिनेशन गाठले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध होत असताना किंवा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुणवत्ता उपलब्ध असताना येणारा काळ अधिक आशादायी आहे हेच जाणवेल. त्या घडामोडीमुळे पुण्यातील विद्येचे माहेरपण आणखी अधोरेखित होताना दिसणार आहे. पण या वेळी ते पारंपरिक नव्हेतर नव्या आधुनिक व्यावसायिक व कौशल्याधिष्ठित शिक्षणामुळे..
आज पुण्यात अॅनिमेशन व गेमिंगचा उपयोग केवळ गेमिंग वा छोटय़ा मनोरंजनाच्या सीडी वा जाहिराती तयार करण्यापुरता राहिलेला नसून, तो आर्किटेक्चरल, मेकॅनिकल, लँडस्केपिंग व थीम पार्कसारख्या विषयात मोठय़ा प्रमाणात होताना दिसत आहे. एवढेच नव्हेतर त्याही पुढील मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून गार्डियन कॉपरेरेशनकडून नवीन संकल्पना मीडिया अँड एन्टरटेन्मेंटच्या क्षेत्रात सादर करण्यात येत आहेत. अॅनिमेशन व गेमिंग क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचा हा व्यवसाय सुमारे आठशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा बनलेला आहे. हा आकडा येत्या काही वर्षांमध्ये आणखी वाढलेला दिसेल. अशी आशा व्यक्त केली जात आहे.
एका ताज्या आकडेवारीनुसार गेमिंगची निर्मिती करणारे स्टुडिओज पुण्यात लक्षणीय संख्येने उभे झाले आहेत. होत आहेत. त्याशिवाय ऑनलाइन गेमिंगचे पोर्टलसुद्धा पुण्यातून यशस्वीरीत्या हाताळले जाते ही बाब दखल घेण्याजोगी आहे. मात्र आता गरज आहे ती हे विद्येचे माहेरघर डिझाइन अँड अॅनिमेशन डेस्टिनेशन म्हणून सादर करण्याची, त्याची ही ओळख वाढविण्याची.
शासकीय धोरणांचा अभाव
विद्येचे हे माहेरघर डिझाइन अँड अॅनिमेशन डेस्टिनेशन बनण्यासाठी नितांत गरज आहे ती क्षेत्रासाठीच्या पूरक वातावरणाची अन् पूरक शासकीय धोरणांची. राज्य शासनाने पूरक धोरण बनवले तर निश्चितच त्याचा फायदा डिझाइन अॅनिमेशनसह मीडिया अँड एन्टरटेन्मेंट क्षेत्राला होताना दिसेल. एवढेच नव्हे तर पुण्यात वाढणाऱ्या उद्योगांची गरज लक्षात घेऊन, कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ तयार करणारे अभ्यासक्रम राबविण्याची गरज आहे. दुर्दैवाने स्थानिक विद्यापीठ या गरजेची गंभीर दखल घेताना दिसत नाहीत.

अॅनिमेशन व गेमिंग क्षेत्र- नवी आशा
अॅनिमेशन उद्योगाला नॅसकॉमने उत्कृष्ट करीअर पर्यायांमध्ये सर्वप्रथम स्थान दिले आहे. येत्या वर्षांत या क्षेत्रामध्ये संधीची रेलचेल असणार आहे. जागतिक गेमिंग उद्योग आज २५० बिलियन डॉलर्सचा एवढा मोठा असून, इंडस्ट्रियल डिझाइन, ट्रान्स्पोर्ट डिझाइन उद्योग त्यापेक्षाही मोठा आहे. अमेरिकेत तर ही अॅनिमेशन व गेमिंग इंडस्ट्री हॉलिवूडपेक्षाही मोठी आहे. भारतात अॅनिमेशन क्षेत्राची वाढ लक्षणीय संख्येने होते आहे. द आइस एज, लायन किंग, अॅट्स, अवतार, तर भारतातील हनुमान, माय फ्रेंड गणेशा, दिल्ली सफारी आदी विविध चित्रपट आजही विलक्षण लोकप्रिय आहेत. ही भरभराट लक्षात घेता या क्षेत्रांना, कल्पक, सर्जनशील, बुद्धमिंान व सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. नवीन दिशा देऊ शकणाऱ्या शैक्षणिक संस्थांसोबतच व उत्तम नेतृत्व करून रोजगाराच्या संधी निर्माण करणारे उद्योग निर्माण करण्याची गरज आहे. आज अशा या क्षेत्रांकडे गांभीर्याने पाहायला हवे. कौशल्याकडे बघण्याचा मूलभूत दृष्टिकोन बदलला पाहिजे. सर्जनशीलतेच्या संकल्पनाही वेगळय़ा रूपात, विविध माध्यमांतून आपल्यासमोर येत आहेत. जसे, की गेमिंगमध्येही आज एकाग्रता, स्मरणशक्ती विकसित करणारे चांगले गेम्स आहेत. या बदलांना विद्यार्थ्यांनी स्वीकारले पाहिजे. त्यांच्यासाठी विविध संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत आणि यासाठी येत्या काही वर्षांत मानसिकता आणि शासनाचे धोरण हे दोन्हींमध्ये जाणीवपूर्वक बदलाची आवश्यकता आहे.
                            (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, गार्डियन कॉर्पोरेशन)