पुणे : वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२३ दरम्यान या तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन पुण्यातील भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी संगमवाडी येथे केले आहे. पण या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भीम आर्मी एकता बहुजन संघटनेकडून विरोध दर्शविला आहे. तर या विरोधाबाबत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर त्यांनी बोलणे टाळले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम होऊ नये, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : अनिस सदस्य मिलिंद देशमुख
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आजवर अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये येणार्या लोकांना भविष्य सांगणं, चमत्काराचे दावे केले आहेत. त्यामुळे पुण्यात होणार्या कार्यक्रमात देखील असाच प्रकार घडणार आहे. तसेच आपल्या राज्यात जादूटोणा विरुद्ध कायदा असून अशा प्रकारचे दावे करणाऱ्या विरोधात कारवाई होऊ शकते आणि कारवाई झाली पाहिजे. हा कार्यक्रम होऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलींद देशमुख यांनी केली आहे.
आणखी वाचा-पुणे : धनकवडीत भरधाव मोटारीची सात वाहनांना धडक, तिघे जण जखमी; अल्पवयीन मुले ताब्यात
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिल्यास विरोध दर्शविणार : दत्ता पोळ
समाजात अंधश्रद्धा पसरविण्याच काम धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे करीत आहेत. अनेक कार्यक्रमामध्ये महिलांबाबत अपशब्द बोलत राहत आले आहेत. यातून दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य आजपर्यंत करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी देऊ नये, जर या कार्यक्रमाला परवानगी दिली तर आम्ही विरोध दर्शविणार असल्याचा इशारा भीम आर्मी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांनी पोलीस प्रशासनाला यावेळी दिला.