पुणे / इंदापूर : इंदापूर तालुक्यात पाच हजार पाचशे कोटींची विकासकामे केल्याचा दावा करण्यात येतो. मात्र तालुक्यात विकास तर कुठेच दिसतच नाही. मग विकासकामांचा निधी गेला कुठे, अशी विचारणा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी केली. विकासाची कामे न करणारी मलिदा गँग हटवून इंदापूर तालुका वाचवा, असे आवाहनही त्यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेले इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी अंकिता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. इंदापूर येथून हर्षवर्धन यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. यानिमित्ताने इंदापूर तालुक्यात जनसंवाद यात्रेचे आयोजन करत त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.

हेही वाचा >>>शहरासाठी १ हजार नव्या ई-बसचा प्रस्ताव, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पाठपुरावा

गेल्या दहा वर्षांमध्ये इंदापूर तालुक्यात युवक आणि महिलांना रोजगार देण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नाहीत. तालुक्यात नेतृत्वाचा आणि दूरदृष्टीचा अभाव होता. त्यामुळे सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने तालुका कायमच पिछाडीवर गेला. सध्या तालुक्यात फक्त मलिदा गँगच्या ठराविक लोकांचा विकास झाला आहे. इंदापूर तालुक्यात पाच हजार पाचशे कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत, असा दावा सातत्याने केला जातो. मात्र, जनतेला विकास कुठेच दिसत नाही. त्यामुळे विकासकामांचा निधी कुठे गेला, असा प्रश्न उपस्थित होतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोणी देवकर औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग आणले जातील. शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्राच्या विकासासाठी काम केले जाईल. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने उभे रहा, असे आवाहन पाटील यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita patil thackeray question to harshvardhan patil regarding funding for development works in indapur taluka pune print news apk 13 amy