पिंपरी- चिंचवड: पहाटेचा शपथविधी आणि नुकत्याच झालेल्या शपथविधीचे साक्षीदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांनी २०२४ मध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवार यांचं मुख्यमंत्री पदाचा स्वप्न पूर्ण करायचं असल्याचं म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
अण्णा बनसोडे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उद्याचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनता बघते आहे. त्यामुळेच २०२४ च्या विधानसभेला राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवार यांचं मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करायचं आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आगामी काळात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांच्याकडे बघितलं जातं. अजित पवारांच्या पहाटेचा शपथविधीला एकमेव आमदार बनसोडे पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची आशा अजित पवार यांच्याकडून आहे.