पिंपरी- चिंचवड: मी आज ही शरद पवारांना दैवत मानतो. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा कणखर नेता मिळाला आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहून देशाच्या प्रगतीत हातभार लावत आहोत. देशाचा मानसन्मान वाढवण्यासाठी त्यांना पाठबळ दिलं. असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या सत्कार समारंभाला अजित पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजप आमदार अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, अण्णा बनसोडे हे दिसायला लहान असले तरी कीर्ती महान आहे. तसे माजी आमदार विलास लांडे आहेत की नाही. हे सर्वांना माहीत आहे. “गडी उभा अन आडवा त्याच्या रुपात गावरान गोडवा” असे अजित पवारांनी म्हणताच जाहीर कार्यक्रमात हशा पिकला. पुढे ते म्हणाले, अण्णा बनसोडे यांना वागत असताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. बोलण्यावर, कृतीवर, वागण्यावर सर्वांचं बारीक लक्ष असणार आहे. परिवाराकडेदेखील सर्वांचं लक्ष असेल. चिरंजीवालादेखील चार गोष्टी व्यवस्थित सांगा. मी माझ्या चिरंजीवाला सांगत असतो. आपण जेव्हा मोठ्या पदावर गेलो. आपल्याच घरातील व्यक्तीने काही गडबड केली तर आपली, पक्षाची बदनामी होते. त्यामुळं आपण व्यवस्थित काम केले पाहिजे, असा सल्ला अजित पवारांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना दिला.