महाराष्ट्रातील सर्व पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. महायुतीमधील प्रमुख नेते देखील जागावाटपावर विचार विनिमय करू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत पिंपरी मतदारसंघावरून तिढा निर्माण होईल असं चित्र पाहायला मिळत होतं. हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाकडे आहे. अण्णा बनसोडे हे येथील विद्यमान आमदार आहेत. मात्र, भाजपाचे स्थानिक नेते अमित गोरखे हे देखील या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे पिंपरीमधील वातावरण तापलं होतं. मात्र पिंपरी विधानसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण होण्याआधीच महायुतीने त्यावर उपाय शोधला आहे. भारतीय जनता पार्टीने अमित गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अमित गोरखे विधान परिषदेवर गेल्यामुळे अण्णा बनसोडे यांच्या वाटेतील काटा दूर झाल्याचं बोललं जात आहे. यावर बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बनसोडे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या वाटेतील काटा दूर झाला आहे असं बोललं जातंय, त्याबाबत काय सांगाल? यावर उत्तर देताना बनसोडे म्हणाले, “तसं म्हणता येणार नाही. कारण गेल्या दोन वर्षांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांचं सरकार आहे. प्रत्येक मतदारसंघात तिथल्या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. आमच्या मतदारसंघात भाजपाचे अमित गोरखे इच्छुक होते. परंतु, आता भाजपाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.”

अण्णा बनसोडे म्हणाले, “प्रत्येक पक्ष त्या त्या मतदारसंघात योग्य उमेदवाराला उमेदवारी देतात. त्यामुळे आता गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. मी या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवेन. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार करतील, असा माझा ठाम विश्वास आहे. पिंपरी मतदारसंघात मी गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहे आणि ही अजित पवार गटाची जागा आहे. विधानसभा निवडणुकीत ही जागा अजित पवार गटाला सुटेल यावर माझा ठाम विश्वास आहे.”

हे ही वाचा >> “सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे…”; ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा

गेल्या अनेक दिवसांपासून अण्णा बनसोडे नेमक्या कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. तसेच सर्व पक्षांची दारं त्यांच्यासाठी खुली होती. यावर बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी अजित पवार यांचा कट्टर समर्थक आहे, त्यामुळे माझं ठरलं आहे. कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे मी ठरवलं आहे. पिंपरी मतदारसंघात काम करत असताना मला प्रत्येकाचे फोन येतात. परंतु, जो निर्णय घ्यायला हवा तो मी घेतला आहे. मी अजित पवारांच्या पक्षाकडूनच या मतदारसंघातून निवडणूक लढवेन.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna bansode says he will contest pimpri assembly election with ajit pawar led ncp asc
Show comments