पिंपरी महापालिकेच्या जनसंपर्क विभागातील प्रशासन अधिकारी पदावर अण्णा बोदडे यांची नियुक्ती करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहेत.
‘जनसंपर्क’ मध्ये प्रथमच स्वतंत्रपणे प्रशासन अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. गलथान व नियोजनशून्य कारभार अशी प्रतिमा असलेल्या जनसंपर्क विभागात सुधारणा करण्याचे कडवे आव्हान बोदडे यांच्यासमोर राहणार आहे.
बोदडे १९९८ मध्ये पिंपरी पालिकेत रुजू झाले असून जनसंपर्क विभाग, महापौरांचे प्रसिद्धिप्रमुख तसेच स्वीय सहायक अशी जबाबदारी त्यांनी आतापर्यंत सांभाळली आहे. आयुक्तांनी नुकतेच प्रशासन अधिकारीपदासाठी भरतीप्रक्रिया राबवली, त्यात बोदडे उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांची जनसंपर्क विभागात नियुक्ती करण्यात आली. अनैतिक संबंधातून झालेल्या एका आत्महत्या प्रकरणात आरोपी करण्यात आल्याने जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या रिक्त जागी कामगार कल्याण विभागातील अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. तथापि, या विभागाचा पुरेपूर अनुभव असलेल्या बोदडे यांची आयुक्तांनी नियुक्ती केली असून त्यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा