पुण्याचे माजी खासदार, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण उर्फ अण्णा सोनोपंत जोशी यांचे बुधवारी दुपारी येथे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. जनसंघापासून सक्रिय राजकारणात असलेल्या अण्णांनी राजकीय व सामाजिक जीवनातील अनेक पदे भूषविली होती. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अण्णा जोशी यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.
अण्णा जोशी यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ पुणे महापालिकेपासून झाला. ते मूळचे धरणगावचे. पुणे विद्यापीठातून त्यांनी एम. एस्ससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते सक्रिय होते. दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी पुण्याचे उपमहापौरपदही भूषविले. त्यानंतर १९८० व १९८५ मध्ये ते पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून आणि १९९० मध्ये कसबा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. याच काळात त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. लोकसभेच्या १९९१ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते भाजपतर्फे पुण्यातून निवडून गेले होते. भाजपचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. विधानसभेची २००९ मध्ये झालेली निवडणूक ते कोथरूड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर त्यांनी ठसा उमटवला होता. पुणे सहकारी बँकेचे ते संस्थापक अध्यक्ष हाते. महापालिका सभागृहात तसेच विधानसभेतही त्यांची अभ्यासू आमदार म्हणून छाप होती. उत्तम वक्ते आणि लोकसंपर्कासाठीही ते प्रसिद्ध होते. पुण्यातील सर्व राजकीय पक्षांमधील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क होता.
* अण्णा जोशी यांनी दीर्घकाळ पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणून काम केले. कार्यकर्ते व जनतेमध्ये सदैव रमणारा नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाने पक्ष एका अनुभवी नेत्याला मुकला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</span>
* दांडगा जनसंपर्क, जनतेच्या प्रश्नांची जाण हे अण्णांचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या निधनाने एक उत्तम संसदपटू, अभ्यासू नेता आणि प्रभावी वक्ता हरपला आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
* राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अण्णा पन्नास वर्षे सक्रिय होते. ते जरूर भाजपाचे नेते होते; पण सर्व पक्षांमध्ये त्यांचा संपर्क होता. महापालिका ते लोकसभा ही त्यांची कारकीर्द नक्कीच यशस्वी ठरली. सभागृहामध्ये प्रश्नांची मांडणी करण्याची त्यांची होताटी सदैव लक्षात राहील.
अंकुश काकडे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस</span>