पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुक पाहण्यास विविध भागातून हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीला मंडई चौक येथून मानाचा पहिला कसबा गणपतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती करून सुरूवात झाली आहे. त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाची मिरवणुक पालखीमधून टिळक चौक,बेलबाग चौक तेथून पुढे अलका टॉकीज चौकाच्या दिशेने न्यू गंधर्व ब्रास बँड,शिवमुद्रा आणि ताल ढोल ताशांच्या गजरात मार्गस्थ झाली. गणेशोत्सवपूर्वी इटली येथील अॅना मारा या तरुणीने श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडामध्ये मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले होते. तर या तरुणीने आज विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन प्रात्यक्षिक सादर करून पुणेकर नागरिकांची मने जिंकली.
हेही वाचा… विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ते बंद; पालकमंत्र्यांनी केला मेट्रोने प्रवास
हेही वाचा… पुण्यातील विसर्जन मिरवणुक मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीने सायबर क्राईमवर आधारित साकारल्या रांगोळी
यावेळी अॅना मारा यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडयामधील व्हिडीओ सोशल मीडियावर पहिला होता. त्यानंतर येथील प्रशिक्षक यांच्याशी संवाद साधला आणि मी पुण्यात येऊन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले आणि आज प्रात्यक्षिक देखील सादर केले. तसेच मी भारतीय संस्कृती बद्दल आजवर ऐकले होते. आज प्रत्यक्षात त्या वातावरणाचा अनुभव देखील घेतला असून मी आनंदी आहे.आता मी पुढील वर्षी देखील मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे तिने सांगितले.