एकाकी जीवनामध्ये आपल्यासारखेच एकटेपण असलेल्या व्यक्तींच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘आनंदयात्रीं’ ना चित्रपट आणि रंगभूमीवर एकाकीपणाच्या व्यक्तिरेखा साकारणारे दिलीप प्रभावळकर यांचे दर्शन घडले. त्यांच्याशी झालेल्या संवादातून विविध भूमिकांचे कंगोरे आणि समर्थ अभिनेत्याच्या व्यक्तिमत्त्वाचेही पैलू उलगडले.
प्रौढ एकाकींसाठी कार्य करणाऱ्या आनंदयात्रा या गटाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सदस्यांशी संवाद साधला. एवढेच नव्हे तर, प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. डॉ. हेमंत देवस्थळी यांनी गटाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
एकाकी जीवन जगणाऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलविण्यासाठी गट कार्यरत आहे हे ऐकून आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. अशी कल्पना फक्त पुण्यातच साकार होऊ शकते. या कामासाठी सहसंवेदना आणि सहानुभूती असावी लागते, असे सांगून दिलीप प्रभावळकर म्हणाले, अशा स्वरूपाचे दु:ख मी भोगले नसले तरी, रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरच्या आभासी जगातील एकाकीपणाच्या अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘अनुदिनी’ हा स्तंभ लिहिताना मी लेखनाच्या माध्यमातून पाच भूमिका साकारल्या. पुढे याची ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका झाली तेव्हा त्यातील आबा टिपरे ही व्यक्तिरेखा तऱ्हेवाईक एकाकीपणा असूनही सकारात्मक अशीच होती. ‘घर तिघांचं हवं’, ‘आप्पा आणि बाप्पा’ या नाटकांप्रमाणेच ‘गोड गुपित’ चित्रपटातील भूमिका एकाकीपणा असलेल्या वृद्धाचीच होती. ज्या भूमिकेने राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ती ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील गांधीजींची व्यक्तिरेखा हीदेखील एकाकीपणाचीच आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करून त्यांनी एकटेपणा दूर केला.
नोकरी करीत असताना पाच दिवसांचा आठवडा होता. त्याकाळात मी ‘चिमणराव’ केला. त्यानंतर एक महिना हक्काची रजा घेऊन ‘एक डाव भुताचा’ हा चित्रपट केला. ‘हसवाफसवी’ नाटक करताना मी नोकरी सोडली होती. नसिरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन, ओम पुरी, परेश रावल, शाहरुख खान यांसारख्या अभिनेत्यांबरोबर काम करूनही मी केवळ माझ्या भूमिकांपुरतेच पाहात असल्याने मी पाटर्य़ाच्या जगात रमलो नाही.
डॉ. हेमंत देवस्थळी म्हणाले, जोडीदार गमावलेल्या आणि वयाची ४५ वर्षे ओलांडलेल्या एकाकींचा हा गट आहे. यामध्ये केवळ विधवांचाच नाही तर, विधुरांचादेखील विचार केला जातो. प्रौढ स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन सहल, चित्रपट-नाटक पाहण्यासाठी जाण्यामध्ये काही गैर, अनैतिक नाही. भविष्यामध्ये मूल नसल्यामुळे येणारा एकाकीपणा आणि मुले परदेशी असल्याने एकाकी जीवन जगणाऱ्यांसाठी कार्यरत राहण्याची आवश्यकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा