एलबीटीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची धार पाचव्या दिवशी बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसून आले. महापालिका मुख्यालयासमोर व्यापाऱ्यांनी धरणे आंदोलन कायम ठेवले असले तरी गुरुवारी रात्रीपासूनच बहुतांश भागातील दुकाने उघडण्यात आली होती. ज्या व्यापाऱ्यांना आपली दुकाने उघडी ठेवायची आहेत, त्यांना पोलीस मदत करतील, अशी घोषणा उपायुक्त शहाजी उमाप यांनी शुक्रवारी सायंकाळी पिंपरीत केली. त्यानंतर, खासदार गजानन बाबर यांनी पिंपरी बाजारपेठेत ‘चक्का जाम’ आंदोलन केले.
राज्य शासनाने एलबीटी लागू केल्यामुळे रस्त्यावर उतरलेल्या व्यापाऱ्यांनी विविध मार्गाने आंदोलन केले. बाबर यांच्या नेतृत्वाखाली गेले पाच दिवस हे आंदोलन सुरू आहे, त्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. सलग तीन दिवस दुकाने बंद ठेवणाऱ्या व्यावसायिकांनी गुरुवारी सायंकाळी ती उघडली. शुक्रवारी तर सर्रास सगळे व्यवहार सुरू झाले होते. पोलीस उपायुक्त उमाप यांनी, ज्यांना दुकाने खुली करायची असतील, त्यांना मदत करण्याची घोषणा केली. त्यानुसार, अनेकजण पुढे आले. तपोवन मंदिरासमोरील एक मॉल उमाप व निरीक्षक मोहन विधाते यांनी बंदोबस्त देऊन उघडून दिला. तेव्हा खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली. पोलीस आंदोलन चिरडून टाकत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. तर, बाबर यांनी रात्री पुन्हा आंदोलन केले.