पुणे : माजी खासदार राजू शेट्टी यांची राजकीय भूमिका सतत बदलत गेल्याने शेतकरी संघटनेचे नुकसान झाल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’ची घोषणा केली. या आघाडीच्या वतीने विधानसभेच्या २५ जागा लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सोमवारी (२२ जुलै) तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर तुपकर यांनी पुण्यात सहकाऱ्यांची बैठक घेऊन हकालपट्टीच्या निर्णयावर आणि पुढील राजकीय मोर्चेबांधणीवर चर्चा केली.

रविकांत तुपकर म्हणाले, ‘माझी काहीही चूक नसताना शेट्टी यांच्या सांगण्यावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्त पालन समितीला ऑगस्ट २०२३ मध्येच मी माझे मत लेखी कळविले होते. त्याचे उत्तर अद्यापही मला मिळालेले नाही. शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राजकारण करताना सतत आपल्या सोयीची भूमिका घेतली. कधी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, तर कधी ‘रिडालो’स सारखा प्रयोग केला. राजकीय स्वार्थासाठी त्यांनी सतत भूमिका बदलल्यामुळेच शेतकरी संघटनेचे नुकसान झाले आहे.’

हेही वाचा >>>नांदेड सिटी परिसरात भरधाव मोटारीची वाहनांना धडक; दुचाकीस्वार महिला जखमी

‘आमचा वाढता जनाधार शेट्टींना नकोसा’

राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापुरातील तीन तालुक्यांपुरतीच होती. ती संघटना आम्ही राज्यभर नेली. शेट्टी यांनी ऊसदर आंदोलनाच्या बाहेर जाऊन काहीच केले नाही. आम्ही विदर्भ, मराठवाड्यात कापूस, सोयाबीन दरासाठी आंदोलने करीत राहिलो, पण, शेट्टी आमच्या मागे समर्थपणे उभे राहिले नाहीत. आम्ही सतत संघर्ष केला म्हणून आम्हाला जनाधार मिळाला. आमचा वाढता जनाधार त्यांना नकोसा वाटत आहे. चळवळीतील कार्यकर्ता मोठा होऊ नये, असेच त्यांना वाटते. त्यांनी अनेकांची संघटनेतून हकालपट्टी केली. दोन दिवसांपूर्वी माझा नंबर लागला. मला संघटना सोडायची नव्हती, मला त्यांनी संघटनेबाहेर काढले आहे, असेही तुपकर म्हणाले.