अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये बीटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३८ पानांचे इंटर्नशीप धोरणच संकेतस्थळावर जाहीर केले आहे. बीटेक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ६०० ते ७०० तासांची (१४ ते २० श्रेयांकन गुण) इंटर्नशीप बंधनकारक केली असून, इंटर्नशीपला श्रेयांकन गुण (क्रेडिट पॉईंट्स) जोडण्यात आले आहेत.

अभ्यासक्रम पूर्ण होतानाच विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्याच्या उद्देशाने इंटर्नशीप आवश्यक करण्यात आली आहे. पाठय़पुस्तकातील शिक्षणाच्या पलीकडे जाऊन बाजारपेठेतील घडामोडींबाबत, प्रत्यक्ष कार्यपद्धतीची माहिती व्हावी, हा त्यामागील हेतू आहे. त्या दृष्टीने एआयसीटीईने इंटर्नशीपचे धोरणच तयार केले आहे. त्यामध्ये पदवीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या आणि आठव्या सत्रानंतर तीन ते चार आठवडय़ांची इंटर्नशीप करावी लागणार आहे.

तर पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सत्रानंतर तीन ते चार आठवडय़ांची इंटर्नशीप करावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशीप १४ ते २० श्रेयांकन गुणांच्या समकक्ष आणि पदविका अभ्यासक्रमासाठीची इंटर्नशीप १० ते १६ श्रेयांकन गुणांच्या समकक्ष ठरवण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्येक इंटर्नशीप पूर्ण केल्यानंतर अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना  त्या बाबतचे प्रमाणपत्र दिले जाईल. इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची यादी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलकडून जाहीर करण्यात येईल. तसेच या धोरणात इंटर्नशीप संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वेही नमूद करण्यात आली आहेत.

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल स्थापन करण्याची सूचना

एआयसीटीईच्या मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल स्थापन करून सोबत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर नेमण्याची सूचनाही या धोरणात करण्यात आली आहे. या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटर्नशीप उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना करीअरसाठी योग्य मार्ग निवडणे, ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासंदर्भात मार्गदर्शन करायचे आहे. संस्थापातळीवर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, विभाग समन्वयक, मार्गदर्शक प्राध्यापक आणि विद्यार्थी समन्वयक अशी चार स्तरीय व्यवस्था करण्यासही सांगण्यात आले आहे.

इंटर्नशीप आतापर्यंत मोठय़ा शिक्षण संस्थापुरतीच मर्यादित होती. मात्र, आता एआयसीटीईने सर्व मान्यताप्राप्त संस्थांतील विद्यार्थ्यांना बंधनकारक केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटर्नशीपला श्रेयांकन गुण देण्यात आले आहेत. ही पद्धत आतापर्यंत नव्हती. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच मिळत होते, बाहेर काय घडत आहे हे प्रत्यक्ष काम केल्याशिवाय कळत नव्हते. ही उणीव इंटर्नशीप बंधनकारक केल्यामुळे दूर होईल. विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करायला लावण्याचा निर्णय चांगला आहे. इंटर्नशीप धोरणामुळे त्याबाबत नेमकेपणा आला आहे.

– दुर्गेश मंगेशकर, तज्ज्ञ मार्गदर्शक