पुणे : जिल्ह्याचा सन २०२३-२४ साठी एक लाख ४७ हजार ८०० कोटी रुपयांचा वार्षिक पत पुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पीक कर्ज, कृषी मुदत कर्जासह कृषी क्षेत्रासाठी सुमारे ९७५० कोटी रुपयांची, तर सूक्ष, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सुमारे २९ हजार ६९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पत आराखडा सुमारे २६ टक्क्यांनी जास्त आहे.
हेही वाचा >>> पुणे हादरवणाऱ्या राठी हत्याकांडातील आरोपीची मुक्तता, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; सात जणांची निर्घृण हत्या
जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते या आराखड्याचे प्रकाशन झाले. प्राथमिकता क्षेत्रांतर्गत कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, शिक्षण, गृहबांधणी, सामाजिक सुविधा, नूतनीक्षम ऊर्जा आदी प्राथमिकता क्षेत्रासाठी ४७ हजार ८०४ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सूक्ष्म उद्योगांसाठी २४०७ कोटी, लघु उद्योगांसाठी १३ हजार ६८२ कोटी, मध्यम उद्योगांसाठी २२९४ कोटी, खादी आणि ग्रामोद्योगांसाठी ३२८६ कोटी, अन्य ८०३० कोटी याप्रमाणे सुमारे २९ हजार ६९९ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निर्यातीसाठी २५२ कोटी, शैक्षणिक कर्ज ४५० कोटी, गृहकर्ज ६५६८ कोटी रुपये, सामाजिक पायाभूत सुविधा २०८ कोटी, नूतनीक्षम ऊर्जा सुमारे २२ कोटी, अन्य प्राथमिकता क्षेत्रासाठी ८५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये दुर्बल घटकांसाठी ७१७० कोटी रुपये कर्जवाटपाच्या उद्दिष्टाचा समावेश आहे.
एक लाख कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ठ
प्राथमिकता क्षेत्रात समावेश नसलेल्या बाबींसाठी सुमारे एक लाख कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ठ आहे. यामध्ये गृहबांधणी क्षेत्राला ५५ हजार २४७ कोटी रुपये, मोठे उद्योग, प्रकल्प आदींसाठी ४४ हजार ७४९ हजार कोटी रुपयांचा पत आराखड्यात समावेश आहे.