मार्चच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये २०१२-२०१३ या आर्थिक वर्षांतील ग्राहकाच्या कोटय़ातील शिल्लक राहिलेल्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या वितरणात घोळ झाला असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्या काही ग्राहकांना मार्च महिना संपण्यापूर्वी सिलिंडर मिळाले नसल्याची माहिती पुढे येत असल्याने हे अनुदानित गॅस सिलिंडर नेमके गेले कुठे, असा प्रश्नही केला जात आहे.
नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीनुसार अनुदानित गॅसच्या वितरणामध्ये घोळ झाल्याची शक्यता व्यक्त करीत मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात अनुदानित गॅसच्या वितरणाबाबत तपासणी करावी, अशी मागणी सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी जिल्हाधिकारी व अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.
शासनाने ठराविक सिलिंडरवरच अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एप्रिलपासून अनुदानित सिलिंडरचा कोटा नव्याने सुरू झाला आहे. मागील वर्षांतील अनुदानित सिलिंडर शिल्लक असतील, तर ते पुढच्या वर्षांत मिळणार नाहीत, हे यापूर्वीच स्पष्ट झाले असल्याने मार्चच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये गॅसची नोंदणी झाल्यास त्याच आठवडय़ात गॅस दिला जाणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याबरोबरच शेवटच्या आठवडय़ात अनुदानित गॅस सिलिंडर देण्यामध्ये घोळ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार सध्या करण्यात येणाऱ्या तक्रारींनुसार ही शक्यता खरी ठरली असल्याचे बोलले जात आहे.
वेलणकर यांनी याबाबत सांगितले की, गॅस सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सिलिंडर मिळतो. मात्र, मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात काही ठिकाणी नोंदणी केलेल्या सिलिंडरचे वितरण वेळेत झाले नाही. या ग्राहकांना एप्रिलमध्ये म्हणजे दुसऱ्या वर्षांच्या कोटय़ातील अनुदानित सिलिंडर मिळाला. मार्चमध्ये शिल्लक असलेल्या अनुदानित सिलिंडरचे काय झाले, हा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. त्यामुळे मागील वर्षांतील शिल्लक राहिलेले अनुदानित सिलिंडर ग्राहकांच्या नावे टाकून दुसऱ्यालाच विकल्याची शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात कोणत्या ग्राहकाला अनुदानित गॅस देण्यात आला, याची माहिती घेऊन किमान २० टक्के प्रमाणात प्रत्यक्षात संबंधित ग्राहकाकडे चौकशी झाली पाहिजे.