लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल याच्यासह पाचजणांविरुद्ध सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्यान्वये (मोफा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विशाल अरुण अडसूळ (वय ४१, रा. नॅन्सी ब्रह्मा रेसिडन्सी को-ऑप हाऊसिंग सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल सुरेंद्र अगरवाल, रामकुमार अगरवाल, विनोदकुमार अगरवाल, नंदलाल किमतानी, अशिष किमतानी यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध फसवणूक, तसेच मोफा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-शिवसेना शिंदे गटाला केवळ एकच मंत्री पद; श्रीरंग बारणे यांनी जाहीर केली नाराजी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ बावधन येथे बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रह्मा को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत ७१जणांनी सदनिका खरेदी केली. सोसायटीच्या मालकीची मोकळी जागा (ॲमेनिटी स्पेस, पार्किंग) आहे. मोकळ्या जागेच्या नकाशात फेरबदल मंजूर करण्यात आले. नॅन्सी ब्रह्मा सोसायटीच्या सभासदांची परवानगी न घेता बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल तसेच साथीदारांनी सोसायटीच्या जागेतील अकरा मजली इमारत बांधून तेथे ६६ कार्यालये (ऑफिस स्पेस) बांधली. दहा मजली इमारतीत २७ सदनिका, १८ दुकाने बांधली. सोसायटीत सभासदांची फसवणूक केली, असे अडसूळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another case registered against vishal agarwal in pune accident case pune print news rbk 25 mrj