पुणे: शरद मोहोळच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर याच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या कटात सामील होण्यास नकार दिल्याने पोळेकर आणि त्याच्या मामाने तरुणावर भूगाव परिसरात पिस्तुलातून गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी साहिल उर्फ मुन्ना (रा. सुतारदरा, कोथरुड), नामदेव उर्फ मामा कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, ता. मुळशी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजय ज्ञानेश्वर सुतार (वय २७, रा. कासारआंबोली, ता. मुळशी) याने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळचा खून करण्याचा कट पोळेकर आणि कानगुडे यांनी रचला होता. त्यासाठी त्यांनी पिस्तुलांची खरेदी केली होती. त्याचा खून करण्याची संधी ते शोधत होते. १७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास भूगावमधील सीताई लेकच्या वाहनतळावर पोळेकर मोटारीतून आला. त्याच्याबरोबर कानगुडे आणि तक्रारदार सुतार होता. त्यावेळी मोहोळचा खून करायचा आहे. खून प्रकरणात तू सामील हो, असे पोळेकर आणि कानगुडेने सुतारला सांगितले. सुतारने नकार दिल्यानंतर पोळेकर आणि कानगुडे पिस्तूल काढले. सुतारवर पिस्तूल रोखले.
हेही वाचा… स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पिस्तूल रोखल्यानंतर सुतार घाबरला. मोटारीचा दरवाजा उघडून तो पळाला. त्यावेळी पोळेकर आणि कानगुडे यांनी त्याच्या पायाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी पायाला चाटून गेली. दुसरी गोळी पोटरीतून आरपार झाली. गाेळीबारात सुतार गंभीर जखमी झाला. त्यानंतर याप्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोळेकर आणि कानगुडे मोटारीतून पसार झाले. सुतार रुग्णालयात दाखल झाला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर या प्रकाराची माहिती डाॅक्टरांनी पोलिसांना दिली नाही. मोहोळ खून प्रकरणात पोळेकरसह साथीदारांना अटक केल्यानंतर चौकशीत त्यांनी सुतारवर गोळीबार केल्याचे उघङकीस आले. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करून संबंधित गुन्हा तपासासाठी पौड पोलीस ठाण्यात वर्ग केला. पोलिसांनी पोळेकर आणि कानगुडेविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप चव्हाण तपास करत आहेत.