पुणे : शहरात भरदिवसा कोयता गँगने माजविलेली दहशत, तसेच गंभीर गुन्हे रोखण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दररोज सायंकाळी तीन तास पायी गस्त घालण्याची योजना सुरू झाली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून गस्त घालण्यास सुरुवात झाली आहे. गस्त घालणारे पोलीस कर्मचारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या योजनेमुळे पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढणार आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरात दररोज सायंकाळी पाच ते रात्री आठ या कालावधीत पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पायी गस्त घालण्याची योजना मांडली. त्यानुसार गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांनी पायी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस उपायुक्त सायंकाळी पायी गस्त घालणार आहेत. या योजनेमुळे नागरिक आणि पोलिसांमधील संवाद वाढणार असून, गुन्हेगारी घटनांना आळा घालणे शक्य होईल. पायी गस्त योजनेमुळे नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढेल, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – पुण्यात ॲडिनोव्हायरस विषाणूचा शाळकरी मुलांमध्ये संसर्ग
शहरातील संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळांचा परिसर, तसेच वर्दळ नसलेल्या गल्ली-बोळात पोलीस गस्त घालणार आहेत. रस्त्यावर पोलिसांचा वावर वाढल्याने गंभीर गुन्हे रोखणे शक्य होईल, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. पोलिसांची गस्त वाढल्याने सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींना आधार वाटेल. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना सुरू झाली आहे.
नागरिक आणि पोलिसांमधील संवाद वाढावा, पोलिसांविषयी विश्वासार्हता वाढावी या विचाराने दररोज सायंकाळी तीन तास पोलिसांकडून गस्त घालण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस रस्त्यावर दिसल्याने नागरिक विशेषत: महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, तसेच गोपनीय माहिती मिळण्यास मदत होईल. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे गुन्हे रोखणे शक्य होईल. पायी गस्त योजनेचे नागरिकांनी कौतुक केले असून, सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.