परदेशांतून राज्यातील विविध विमानतळांवर दाखल झालेल्या प्रवाशांपैकी पुण्यातील आणखी एका प्रवाशाला करोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही संख्या आता चार झाली आहे. या चार रुग्णांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण अहवाल प्रतीक्षेत आहेत.मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर २४ ते ३० डिसेंबर या कालावधीत आलेल्या प्रवाशांना हा संसर्ग झाला असून त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण अहवालांची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा >>>पुणे: सनदी लेखापाल अभ्यासक्रमात पुढील वर्षी बदल; भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक्रमात समावेश
परदेशात वाढत असलेल्या बीए.७ रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबरपासून राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ३० डिसेंबरपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर ९७ हजार ८०५ प्रवासी आले असून त्यांपैकी १९२६ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीतून करोना संसर्गाचे निदान झालेल्या प्रवाशांची संख्या चारवर पोहोचली असून त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत. यांपैकी दोन प्रवासी पुणे येथील आणि प्रत्येकी एक प्रवासी गोवा आणि नवी मुंबई येथील आहेत. जनुकीय क्रमनिर्धारण अहवालानंतर त्यांना झालेला संसर्ग कोणत्या विषाणू प्रकाराचा आहे, हे स्पष्ट होणार आहे.