संगणक अभियंता अंतरा दास (वय २३) हिचा खून एकतर्फी प्रेमातून झाला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अंतराच्या मित्राला बुधवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्या तीन साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. संतोष कुमार (वय २४, रा. बिहार) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मूळची पश्चिम बंगल येथील व नोकरीनिमित्त निगडी येथे राहणाऱ्या अंतराचा २३ डिसेंबरला तळवडे येथे धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष हा बंगळुरु येथे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत काम करतो. अंतरा प्रशिक्षणासाठी बंगळुरू येथे असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. त्यानंतर मागील ११ महिन्यांपासून तो अंतरार एकतर्फी प्रेम करीत होता. अंतराच्या मोबाइलवर संदेश पाठवून तो तिच्याकडे लग्नाची मागणीही करीत होता. मात्र, अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती. अंतरा काय करते किंवा कोणासोबत असते, यावर लक्ष ठेवण्यासाठी संतोषने मित्रांना सांगून ठेवले होते.
तळवडे येथील कॅपजेमिनी कंपनीत अंतरा एप्रिलपासून नोकरी करीत होती. कंपनीची कॅब घेऊन जाणारी अंतरा २३ डिसेंबरला तळवडे येथील केएनबी चौकातून पायी चालली होती. तिच्यामागून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत पडलेल्या अंतराला रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अंतराच्या कुटुंबीयांनी संतोषबाबत पोलिसांना माहिती दिली. एकतर्फी प्रेमातून तो अंतराला त्रास देत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी २६ डिसेंबरला बंगळुरु येथून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले होते.
संतोषकडे पोलिसांनी दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. अंतराची हत्या संतोषने सुपारी देऊन घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते.