पुणे : ‘माणूस अजूनही उत्क्रांत होत आहे. उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यात होणाऱ्या बदलांबाबत अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार भविष्यात माणसाची उंची वाढेल. मात्र, औषधांच्या अतिवापरामुळे रोगप्रतिकारशक्तीचा अभाव असेल. प्रौढ मानवाच्या जबड्याचा आकार लहान व तुलनेने डोक्याचा आकार मोठा अशी रचना असेल, असे मत मानववैज्ञानिक-पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. सुभाष वाळिंबे यांनी व्यक्त केले.

भवताल फाउंडेशनतर्फे ‘भवताल टॉक ५’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘माणूस कसा घडला, त्याची गोष्ट!’ या विषयावर डॉ. वाळिंबे यांनी भाष्य केले. भवताल फाउंडेशनचे संस्थापक अभिजित घोरपडे उपस्थित होते.

डॉ. वाळिंबे म्हणाले, ‘भविष्यात माणसाच्या अंगावरील केसांचे प्रमाण फार कमी असेल. पुढच्या ३० ते ४० वर्षांत अक्कलदाढ अस्तित्वातच नसण्याची शक्यता अधिक आहे. आजही २० टक्के व्यक्तींना अक्कलदाढ येत नाही, आली तरी ती जबड्याच्या आत असते, बाहेर येत नाही. कोणत्याही सामान्य व्यक्तीला, ‘आपले पूर्वज कोण होते?’ असा प्रश्न विचारला तर वानर, हे उत्तर खात्रीने दिले जाते. आपण वानरापासून उत्क्रांत झालेलो आहोत हे आपल्या मनावर फार पूर्वीपासून बिंबवले गेलेले आहे. मात्र, हा गैरसमज आहे. वास्तव पाहता लेमर, लोरिस, टार्सियर, माकडे, वानर, खार आदींसह मानव प्राणी प्राइमेट या गणात सामावलेले दिसतात. थोडक्यात, माकडासारखेच दिसणारे इतर सस्तन प्राणी हे आपले पूर्वज नसून भाऊबंद आहेत. या सर्वांचा पूर्वज फार पूर्वी एकच होता.’

माणसाच्या उत्क्रांतीवर बोलताना डॉ. वाळिंबे यांनी सांगितले की, माणसाला शक्य असलेली दोन प्रकारची पकड (ग्रिप) एक म्हणजे ‘पॉवर ग्रिप’ अर्थात भक्कम पकड आणि दुसरी म्हणजे ‘प्रिसिजन ग्रिप’ अर्थात नेमकी पकड. माणसाला इतर जीवांपेक्षा वेगळे बनवण्यात या पकडींचे मोलाचे योगदान आहे. त्याशिवाय आपण ‘माणूस’ बनलोच नसतो. मानवी अंगठा बोटांच्या लांबीच्या तुलनेत इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा लांब असतो. हा लांब अंगठा तसेच, त्याची इतर बोटांना सहजपणे स्पर्श करण्याची क्षमता यामुळे माणसाला विविध आकारांच्या वस्तू व्यवस्थित पकडणे आणि हाताळणे शक्य झाले.
निवेदिता कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. अभिजीत कुलकर्णी यांनी आभार मानले.

भविष्यातील माणूस कसा असेल ?

  • जबड्याचा आकार लहान आणि तुलनेने डोके मोठे असेल.
  • उंची वाढेल, पण रोगप्रतिकारक क्षमता कमी होईल.
  • अक्कलदाढ व पायाची करंगळी भविष्यात झडू शकते; यासाठी म्युटेशन कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही, कारण त्यावर माणसाचे नियंत्रण नाही.
  • जगभरात वेगवेगळ्या भागांतील लोक एकमेकांच्या संपर्कात येत असल्यामुळे भविष्यात ते एकसारखेच दिसणारे असतील, त्यांच्यातील दिसण्याचे भेदही कमी होतील.
  • डोके आणि शरीराच्या इतर भागावरील केसांचे प्रमाण फार कमी होईल.
  • कालांतराने ‘डिझायनर बेबी’ ही संकल्पना अस्तित्वात येईल. आपले अपत्य कसे असावे, हे ठरवणे आपल्या हातात असेल.